राणेंच्या मतदारसंघात महाविकास आघाडी

भाजपचा दारुण पराभव
कुडाळमध्ये त्रिशंकु स्थिती

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यातील देवगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने सत्ता संपादित केली आहे. नुकताच जाहीर झालेल्या निकालानुसार भाजप आणि शिवसेना पक्षाला प्रत्येकी 8 तर राष्ट्रवादीला 1 अशा जागा मिळाल्या आहेत. तर कुडाळमध्ये मात्र मतदारांनी कोणालाच स्पष्ट बहुमत दिलेले नाही. येथे भाजप 8, शिवसेना 7 व काँग्रेस 2 असे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे येथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.
काँग्रेसच्या हातात सत्तेची चावी राहिली आहे. येथे भाजप स्वतंत्र, शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र तर काँग्रेस स्वतंत्र लढली होती. त्यामुळे आता काँग्रेस कोणाला साथ देणार? त्यावर सत्ता कोणाची? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, देवगड-जामसांडे, वाभवे-वैभववाडी व कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा दुसरा टप्पा संपला आहे. तेथील उर्वरित प्रत्येकी चार जागांसाठी मतदान प्रक्रिया झाली.
दुसर्‍या टप्प्यात एकूण सात हजार 63 पैकी पाच हजार 299 मतदारांनी हक्क बजावल्याने सरासरी 75.02 टक्के मतदान झाले. मतमोजणी झाली आहे. चारही नगरपंचायतसाठी एकूण 211 उमेदवारांचे बंद झालेले राजकीय भवितव्य समोर येत आहे. राज्यातील 105 नगरपंचायतसह जिल्ह्यातील या चार नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होऊन 21 डिसेंबरला मतदान झाले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याने निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेले प्रभाग वगळून निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे चारही नगरपंचायतीमधील ओबीसी आरक्षित असलेले प्रत्येकी चार प्रभाग वगळून उर्वरित 13 प्रभागांसाठी मतदान झाले. यानंतर निवडणूक विभागाने हे ओबीसी आरक्षित प्रभाग अनआरक्षित करीत पुन्हा सोडत काढली. कुडाळमध्ये 17 जागा असून यासाठी 12 हजार 440 मतदार होते. यातील 21 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानावेळी कुडाळ नगरपंचायतसाठी सहा हजार 538 ( 71.62 टक्के) मतदारांनी मतदान केले होते.
देवगड-जामसांडे नगरपंचायत निवडणुकीत 17 पैकी 8 जागा भाजप व 8 जागा शिवसेनेच्या निवडून आल्या आहेत. तर राष्ट्रवादीच्या एक उमेदवार निवडून आले आहेत. या ठिकाणी शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रित लढली होती. त्यामुळे येथे सेना-राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. भाजप काटावर येऊन या परीक्षेत नापास झाल्याने आ. नितेश राणे यांना धक्का मानला जात आहे.

Exit mobile version