दहापैकी नऊ जागांवर विजय
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कशेळे सहकारी भातगिरणी संस्था निवडणुकीत महाविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या महाविकास आघाडीने विरोधकांचा पराभव करीत विजय मिळविला. या निवडणुकीत ज्येष्ठ कार्यकर्ते तानाजी मते पॅनेलने भात गिरणी ताब्यात घेताना दहापैकी नऊ जागांवर विजय मिळविला आहे.
कशेळे सहकारी भातगिरणी मर्यादित कशेळे या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवार, दि. 14 मे रोजी पार पडली. भात गिरणीवर दहा जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यात इतर मागासवर्गीय विभागातून महेश जनार्दन पेमारे आणि अनुसूचित जाती जमाती जागेवर संचालक म्हणून भीमराव जाधव हे बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे आठ जागांसाठी निवडणूक झाली. शेतकरी कामगार पक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या महाविकास आघाडीसमोर विरोधकांनी आव्हान निर्माण केले होते. मात्र, शेकापचे स्थानिक नेते नारायण डामसे, श्रीराम राणे, गजानन पेमारे, प्रकाश फराट, यशवंत जाधव, महेश म्हसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद लाड, सीताराम मंडावले, बाळू थोरवे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून ज्ञानेश्वर भालिवडे, रामदास घरत यांनी तानाजी मते पॅनलच्या प्रचाराची धुरा सांभाळली.
आज झालेल्या निवडणुकीत महिला मतदारसंघात तीन उमेदवारांची निवडणूक झाली. सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान झाले आणि त्यानंतर मतमोजणी घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी शयाम कपोते यांनी ही प्रक्रिया यशस्वी पार पाडली. त्यावेळी 217 मतदारांनी मतदान केले. त्यातील सात मते बाद झाली होती. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या तानाजी मते पॅनलमधील सुरेखा मते 138, तर निर्मला पाटील 112 मते मिळवून विजयी झाल्या आहेत, तर विरोधी पॅनलमधील विद्या घोडविंदे या पराभूत झाल्या आहेत. संस्था सर्वसाधारण मतदारसंघात सहा जागांसाठी निवडणूक झाली. तेथे महाविकास आघाडीच्या तानाजी मते पॅनलमधील सहा आणि विरोधी पॅनलमधील सहा असे बारा उमेदवार रिंगणात होते. या मतदारसंघात 215 मतदारांनी मतदान केले. त्यातील नऊ मते बाद झाली असून, महाविकास आघाडीचे तानाजी मते- 139, तुकाराम पाटील-122, जयवंत म्हसे- 119, छगन थॉमब्रे-116 आणि बाळू कानडे -112 हे विजयी झाले तर विरोधी पक्षाचे जयराम हरपुडे हे 110 मते मिळवून विजयी झाले. या मतदारसंघात चिंधू बांगर, प्रकाश घोडविंदे, जनार्दन घुडे, अशोक पिंगळे हे सहा जण पराभूत झाले.