| मुंबई | प्रतिनिधी |
विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या 225 जागा निवडून येतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला.
भाजपचे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश झाला. शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. राज्याचे क्रीडामंत्री तथा अजित पवार गटाचे आमदार संजय बनसोडे यांच्या विरोधात सुधाकर भालेराव यांना शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यरत आहे. महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर राष्ट्रवादी पक्षाला बळ दिलं पाहिजे, असच सगळ्यांना वाटत आहे. फुटीर नेत्यांवर बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत. तुम्ही येताना वेगळ्या नावाने मतं मागता आणि जाता दुसरीकडे. हे लोकांना पटत नाही. ज्यांनी जनतेचा घात केला त्या लोकांना धडा शिकवायचा या भावनेनं आपल्याकडे यायचा निर्णय घेतला त्यांचं स्वागत करतो.
शरद पवार पुढे म्हणाले की, राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. पाच वर्षांपूर्वी विरोधी गटाचे फक्त 6 लोक निवडून आले होते. लोकांनी मोदींचे सरकार पाहिले आणि हे बदलण्याचा निर्णय घेतला. यावेळी 31 जणांना निवडून दिलं आहे. या 31 पैकी राष्ट्रवादीच्या 10 पैकी 8 जागा निवडून आल्या आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 288 पैकी 225 जागा निवडून येतील, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.