महाविकास आघाडीला तडा जाणार नाही- ठाकरे

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईबाबत माझ्या मतावर मी ठाम आहे. माझी मते मी मांडली आहेत. मविआला तडा जाईल असं मी बोलणार नाही, असे स्पष्ट मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि.4) मुंबईत व्यक्त केले. शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकाचा संदर्भ घेत ठाकरे यांनी आपले मत नोंदविले. मला व्यक्तीचा नाही तर वृत्तीचा पराभव करायचा आहे. हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे महाविकास आघाडीला तडा जाईल असे वक्तव्य माझ्याकडून कदापि केले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

कर्नाटकात विशेष करुन सीमाभागात जय शिवराय म्हणून मतदान करा असा उद्धव ठाकरेंनी मतदारांना सल्ला दिला. नाणार प्रकल्पावरही त्यांनी भाष्य केलं. बारसूमध्ये मी माझ्या लोकांना भेटयला जात आहे. लोकांचे गैरसमज दुर करा नाहीतर प्रकल्प दूर करा. स्थानिकांसमोर प्रकल्प आधी सादर करा.

शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्‍न आहे. मी त्यावर काहीही बोलणार नाही. यावर मी शरद पवार यांना सल्ला देण्याचा प्रश्‍नच येत नाही. मी त्यांना सल्ला कसा देणार? मी दिलेला सल्ला त्यांच्या पचनी पडला नाही तर काय करु, अशी मिश्कील टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली. प्रत्येक पक्षाला आपापली ध्येयधोरणं ठरवण्याचा अधिकार असतो. त्यामुळे त्यांचा निर्णय होऊ दे, मग मी त्यावर बोलेन. शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीविषयी केलेल्या टिप्पणीचा मुद्दाही पत्रकार परिषदेत उपस्थित झाला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, प्रत्येकाला आत्मचरित्र लिहण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं, हे सगळ्यांना माहिती आहे. राज्यातील जनतेला मी कुटुंबप्रमुख वाटतो. यापेक्षा अधिक काही मला बोलायचे नाही. महाविकास आघाडीला तडा जाईल, असे कोणतेही वक्तव्य मी करणार नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनामध्ये नाही, या शरद पवार यांच्या वक्तव्यावरही उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे, या मतावर मी ठाम आहे. मी त्यावर भविष्यातही बोलत राहीन, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

Exit mobile version