­­­­­­­­महाविकास आघाडी 180 जागा जिंकणार

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना विश्‍वास

| संगमनेर । वृत्तसंस्था ।

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीत 125 जागांवर सहमती झाली असून राहिलेले जागावाटप देखील लवकरच पूर्ण होईल, असा विश्‍वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. गणेशोत्सवानंतर चर्चा करून सर्वांच्या सहमतीने जागावाटप पूर्ण होईल. एमआयएमबाबत प्रस्ताव आल्याची मला माहिती नाही. मात्र, जे काही निर्णय होतील ते उच्च पातळीवर होतील असं थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. तर विधानसभा निवडणुकीत 180 पेक्षा जास्त जागा निवडून आल्या तर नवल वाटू देऊ नका, असेही वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीत काही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत विचारले असता बाळासाहेब थोरात म्हणाले की, महायुतीत मैत्रीपूर्ण लढती नव्हे तर खर्‍याखुर्‍या लढती सध्या सुरू आहेत. त्यांच्यात सगळ्यांना पुढे जायचं आहे कोणी मागं जायला तयार नाही. आमच्या जागा वाटपात आम्ही देखील आग्रह धरू. मात्र, जो काही निर्णय असेल तो सहमतीनेच घेतला जाईल. महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? अशी चर्चा आम्ही कधीच करत नाही, असे त्यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत बुधवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी हजेरी लावत श्री गणेशाची आरती केली. याबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले की, सरन्यायाधीश हे मोठं नाव आहे. ते महाराष्ट्रातील आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच वाटतो. न्यायव्यवस्थेवर सरकार दबाव टाकतं ही चर्चा सध्या सुरू आहे. मात्र, चंद्रचुड हे त्या पलीकडचे आहेत, असे मला वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे मुस्लिम उमेदवार देणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले की, याबाबत उद्धव ठाकरेंनी कायम भूमिका मांडलेली आहे. ते धर्मात भेद करत नाहीत. देश विरोधी वागणार्‍या मुस्लिमांच्या विरोधात आम्ही आहोत, हे उद्धव ठाकरे कायम सांगतात. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचं निश्‍चित कौतुक केलं पाहिजे. त्यांनी योग्य अशी भूमिका घेतली आहे. मुस्लिमांना त्यांच प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे हे योग्य आहे आणि आमचा देखील तसा प्रयत्न राहील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version