चौलमळा येथे महाविकास आघाडीचा झंझावात

ग्रामदेवता आई कृष्णादेवीचे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ

| चौल | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील चौलमळा गावात महाविकास आघाडीच्या प्रचाराने प्रचंड वेग घेतला असून, संपूर्ण परिसरात विजयाचा आत्मविश्वास दिसून येत आहे. ग्रामदैवत आई कृष्णादेवी मातेचे आशीर्वाद घेऊन शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस महाविकास आघाडीच्यावतीने चौल मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे उमेदवार सुरेंद्र म्हात्रे आणि चौल-वरंडे पंचायत समितीच्या उमेदवार अनया अमित फुंडे यांच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी आई कृष्णादेवी मातेच्या चरणी नारळ अर्पण करून उमेदवारांच्या विजयासाठी साकडे घालण्यात आले.

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर घरत, चौलमळा गावचे माजी सरपंच अनंत म्हात्रे, माजी उपसरपंच नंदकुमार म्हात्रे, शेकापचे निष्ठावान कार्यकर्ते व चौलमळा गावचे पंच आर.डी. नाईक, ज्येष्ठ नागरिक शरद नाईक, मोरेश्वर म्हात्रे, किशोर द. घरत, चंद्रकांत मुकादम आदी मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. सर्वांनी एकमुखाने आई कृष्णादेवीला साकडे घालत आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रार्थना केली.

याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर घरत यांनी, चौलमळा गावात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दोन्ही उमेदवार निश्चितच भरघोस मतांनी विजयी होतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला. विकास, प्रामाणिक नेतृत्व आणि जनतेशी असलेली नाळ यामुळे ग्रामस्थांचा विश्वास महाविकास आघाडीवर असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास चौल ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच रुपाली म्हात्रे, माजी उपसरपंच काशिनाथ घरत, माजी सदस्य शशिकांत म्हात्रे, आर. डी. म्हात्रे, विजय ठाकूर, राजेंद्र ठाकूर, निलेश नाईक, चौलमळा गावचे युवा नेते शैलेश नाईक, महेंद्र नाईक, महेश पाटील, शिवसेना उबाठा गटाचे प्रशांत आमरे, मनिष नाईक, प्रमोद घरत यांच्यासह अमित फुंडे, सूरज फुंडे, संस्कार म्हात्रे, पांडुरंग पाटील, प्रशांत वर्तक, आशिष पाटील आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर चौलमळा गावात घरोघरी फिरून महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रचारपत्रके वाटप करण्यात आली. ग्रामस्थांशी थेट संवाद साधत दोन्ही उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी चौलमळा ग्रामस्थांकडून आघाडीच्या उमेदवारांना मोठा आणि ठाम पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. ‘आमचं ठरलंय, आमचं मत महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना’ असा निर्धार अनेक ग्रामस्थांनी बोलून दाखवला. महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या झंझावाताला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून, चौलमळा गावात आघाडीचा विजय निश्चित मानला जात आहे. ग्रामस्थांचा विश्वास, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि विकासाचा अजेंडा यामुळे विजयाचा मार्ग अधिकच सुकर झाल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.

Exit mobile version