नागरीकांना सहभागी करण्यासा गटनिहाय दौरा
। पनवेल । वार्ताहर ।
पेट्रोल आणि डिझेलच्या सलग नवव्या दिवशी वाढणार्या किंमती, गगनाला भिडणारे एलपीजी गॅसचे दर या सगळ्याचे थेट परिणाम महागाईवर होत आहेत. कोरोना महामारी नंतर सावरणार्या सामान्य जनतेला खरे तर केंद्र सरकारने दिलासा देणे अभिप्रेत होते. परंतु दिलासा देणे राहिले दूर, सामान्य जनतेला महागाईच्या दरीत लोटण्याचे पाप केंद्रातील मोदी सरकार करत आहे. या विरुद्ध सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पनवेल-उरण महाविकास आघाडीच्या वतीने महामोर्चा काढण्याचे नियोजन सुरू केले आहे. या महामोर्च्यामध्ये कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त त्रस्त नागरिकांपर्यंत पोहोचावे व त्यांना महामोर्चात सहभागी होण्यासाठी उद्युक्त करावे या उद्देशाने पनवेल उरण महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद गटनिहाय दौर्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौर्याला मंगळवार (दि.5) पासून प्रारंभ करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद गट निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले असून पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिक व कार्यकर्त्यांसाठी शनिवारी बैठकांचे आयोजन करण्यात आलेले आहे. मंगळवारी (दि.5) वावंजे, नेरे, पळस्पे, पाली देवद या जिल्हा परिषद मतदार संघात बैठका संपन्न झाल्या. तर बुधवारी गुळसुंदे, केळवणे, गव्हाण आणि वडघर या जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. कळंबोली विभागातील नागरिक व कार्यकर्त्यांना मोर्चाचे नियोजनाबाबत अवगत करण्यासाठी नगरसेवक सतीश पाटील यांच्या न्यू इंग्लिश हायस्कूल, कळंबोली येथे बैठक आयोजित केली जाणार आहे. कामोठे विभागासाठी माजी आ.दत्तूशेठ पाटील हायस्कूल कामोठे येथे बैठक होणार असून पनवेल विभागातील नागरिकांची बैठक व्ही.के.हायस्कूल येथे आयोजित केली जाईल अशी माहिती पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील आणि सचिव सुदाम पाटील यांनी दिली.
या आढावा बैठक यांना कार्यकर्ते व नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या बैठकांना आ.बाळाराम पाटील, पनवेल शहर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आर.सी.घरत, शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, मा.आ.मनोहर भोईर, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील, पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड, जी.आर.पाटील, समाजवादी पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल नाईक, पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.