। पनवेल । प्रतिनिधी ।
नवीन पनवेलमध्ये तिथीनुसार भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने जैन समाजाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत जैन बांधवांनी मोठ्या संख्येने उत्साहाने सहभाग नोंदवला. रथामध्ये भगवान महावीरांचा आकर्षक पुतळा विराजमान करण्यात आला होता, ज्यामुळे भक्तांचे विशेष आकर्षण ठरले. भगवान महावीरांच्या संदेशांचा प्रसार करण्यासाठी विविध फलक व घोषवाक्ये घेण्यात आली होती. विशेषतः लहान मुलांच्या हातात जनजागृतीपर बॅनर देऊन सामाजिक संदेश देण्यात आला. अहिंसा, सत्य आणि करुणा या तत्त्वांचा प्रचार रॅलीतून करण्यात आला. शिस्तबद्ध पद्धतीने रॅली शहरातील विविध मार्गांवरून काढण्यात आली. संपूर्ण परिसरात धार्मिक व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत कौतुक केले.






