आधुनिक तंत्रज्ञान घराघरात पोहोचवण्याचा संकल्प
| म्हसळा | प्रतिनिधी |
आधुनिक व वैज्ञानिक शेती पद्धती, शासनाच्या योजना आणि डिजिटल साधनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी स्वयंसेवकांची महत्त्वाची भूमिका आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने विकसित केलेल्या ‘महाविस्तार’ ॲपविषयी जागरूकता आणि प्रशिक्षण देण्यासाठी वसंतराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालय आणि बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालय, म्हसळा येथील एन.एस.एस. विभाग व वनस्पती शास्त्र विभागातर्फे संयुक्तपणे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमातून तंत्रज्ञानाचा लाभ दुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य दिगंबर टेकळे, मंडळ कृषी अधिकारी सुशील कुमार घोडगे, उपकृषी अधिकारी रामेश्वर मगर, सहाय्यक कृषी अधिकारी अधिराज गायकवाड, तसेच सहाय्यक कृषी अधिकारी अशोक सानप उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना माहिती देताना सांगितले की, ‘महाविस्तार’ हे एआय आधारित नि:शुल्क ॲप आहे, जे शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन, खत नियोजन, हवामान मार्गदर्शन, तसेच कीडरोग नियंत्रणाबाबत अचूक आणि तात्काळ माहिती उपलब्ध करून देते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मोबाईलद्वारे ॲपचा वापर करून मार्गदर्शन घेतले. डाऊनलोड, नोंदणी, लॉगिन कसे करायचे याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. ॲपमधील चा वापर करून आंबा तसेच इतर पिकांवरील कीडरोग, उपाययोजना आणि शिफारसी कशा मिळवायच्या याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. पिकानुसार खताची मात्रा, त्यासाठीचे मार्गदर्शन आणि हवामानानुसार पिक निवड यासंबंधीची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
महाविस्तार ॲपबरोबरच कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा 170 पेक्षा जास्त डीबीटी कृषी योजनांची माहिती दिली. तसेच शेतीस पूरक आधुनिक तंत्रज्ञान, पद्धती आणि उपयुक्त योजनांवरही सविस्तर चर्चा झाली. कार्यक्रमाच्या यशासाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. राजेंद्र हलोर व प्रा. मयुर बढे यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांचा निर्धार
विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील नागरिक, शेतकरी, महिला बचत गट आणि तरुणांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी मिळवलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता गावातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. ‘महाविस्तार’ ॲपचा योग्य वापर झाल्यास हजारो शेतकऱ्यांचे जीवन बदलू शकते.
सुशील कुमार घोडगे,
मंडळ कृषी अधिकारी
