एका महिन्याचे वीज बिल 49 हजार रुपये
| अलिबाग | प्रतिनिधी |
स्मार्ट मीटरचा प्रश्न चर्चेत असताना ग्राहकांना भरमसाठ वीज बिल महावितरण कंपनीकडून देण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील चिंचोटी येथील ग्राहकाला एका महिन्याचे 49 हजार रुपयांचे बिल आले आहे. महावितरणचा अजब कारभार यातून दिसून आला आहे.
वीजपुरवठा खंडित होणे, रिडींग चुकीचे घेणे, या समस्येबरोबरच वापर नसताना ग्राहकांना अपेक्षेपेक्षा वीज बिल येत आहे. मागील काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाला 36 हजार रुपये वीज बिल आले होते. याबाबत त्यांनी अनेकवेळा महावितरण कार्यालयात चपला झिजवल्या. मात्र, त्यांना प्रश्न सुटला नाही. अखेर त्यांनी महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. आता पुन्हा हाच प्रकार समोर आला आहे. चिंचोटीमधील जानू हिरू पाटील यांना एका महिन्याचे 49 हजार रुपये वीज बिल आल्याची बाब समोर आली आहे. त्यांना दर महिन्याला 410 ते 430 रुपयांचे बिल येते. त्यांचा विजेचा वापरही कमी असताना भरमसाठ बिल आल्याने महावितरणच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे.
सक्तीच्या मीटरचा तगादा
महावितरण कंपनीमार्फत गेल्या अनेक दिवसांपासून मोफत वीज मीटर बसविण्याचे काम केले जात आहे. महावितरणचे कर्मचारी कोणाला काही न सांगता थेट जूने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवत आहे. घरात कोणीही नसताना हा प्रकार केला जात आहे. सक्तीच्या मीटरचा सध्या तगादा सुरू असल्याचे चिंचोटीच्या माजी सदस्या देवायनी पाटील यांनी सांगितले. यापूर्वी स्मार्ट मीटर सक्तीरोधात लढा पुकारण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी सक्तीच्या मीटरला बंदी घातली, तरीदेखील महावितरणचे कर्मचारी स्मार्ट मीटर सक्तीने लावून जात असल्याचा प्रकार चिंताजनक असेही त्या म्हणाल्या.






