लटकण्याच्या अवस्थेतील विद्युत खांब हटवला
| वेनगाव | वार्ताहर |
कर्जत शहरातील आमराई येथील रहदारीच्या रस्त्यावर विद्युत खांब लटकण्याच्या अवस्थेत काही दिवसांपासून तसाच होता. त्यामुळे तेथून जाणाऱ्या वाहनचालक व रहिवाशांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत होते. या गंभीर बाबीकडे महावितरणचे दुर्लक्ष होत होते. कृषीवलने याबाबत आवाज उठवल्यनंतर महावितरण खडबडून जागी झाली असून, तो खांब तात्काळ हटविण्यात आला आहे.
आमराईतील रहदारीच्या रस्त्यावर विद्युत खांब धोकादायक स्थितीत होता. याबाबत महावितरणकडे वारंवार अर्ज विनंत्या करुनही दुर्लक्ष होत होते. दरम्यान, या ठिकाणी मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत होता. कृषीवलने नागरिकांच्या जीवाशी होत खेळाबाबत आवाज उठविल्यानंतर महावितरण खडबडून जागी झाली. कृषीवलच्या बातमीची दखल घेऊन त्वरित आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत तो खांब हटवण्यात आला. सदर धोकादायक विद्युत खांब हटवल्याने येथील रहिवासी व वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, याबाबत कृषीवलचे आभार मानले आहेत.