बिल्डरांना लाभ, अधिकारी मालामाल; माहितीच्या अधिकारात गौडबंगाल उघड
| पेण | प्रतिनिधी |
महावितरणची एनएससी योजना म्हणजे नवीन वीज जोडणीसाठी पायाभूत सुविधा उभारणीचा खर्च ग्राहकांनी आणि महावितरणने विभागून उचलण्याची योजना आहे. या योजनेत महावितरण नवीन वीज जोडणीसाठी किंवा भार वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उदा. रोहित्रे, तारा, खांब इ. उभारण्यासाठी येणारा खर्च ग्राहकांसोबत वाटून घ्यायाचा आहे. परंतु, पेणमध्ये 53 जणांना या योजनेचा लाभ दिला आहे. यामध्ये बिल्डर लॉबीचा समावेश आहे. त्यामुळे सरकारचा पैसा वापरून बिल्डरांना लाभ दिल्याचे माहितीच्या अधिकारामध्ये उघड झाले आहे.
महाराष्ट्र शासनाने ही योजना तयार करताना एक गोष्ट निश्चित ठरविली होती ती म्हणजे गरजवंत ग्राहकांना वीजपुरवठा करणे आणि महावितरण कंपनीचे ग्राहक वाढविणे. परंतु, अधिकारीवर्गाने आयडीयाची कल्पना लढवून खरंच ज्यांना सर्व पैसे देणे शक्य नाही, अशा ग्राहकांना वगळून बिल्डर लॉबीला फायदा करून दिला आहे. बिल्डर हे गृहप्रकल्प निर्माण करत असताना वीजजोडणीचा खर्चसुद्धा सदनिका विकत घेणाऱ्यांकडून घेत असतात. मात्र, असे असताना शासनाच्या योजनेचा फायदा घेऊन अधिकाऱ्यांना लक्ष्मीदर्शन देऊन मालामाल केल्याची चर्चा आहे.
याबाबत रायगड जिल्हा महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे भाजपने तक्रार करण्यात आली आहे. या योजनेसंदर्भात अधीक्ष्ाक अभियंता धनराज बिक्कड हे चौकशीसाठी समिती गठीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे चौकशीअंती अधिकारी आणि बिल्डर तसेच ठेकेदार यांचे आपापसातील संबंध समोर येतील, अशा चर्चेला उधाण आले आहे. कारण, बिल्डर महावितरणच्या ठेकेदारांशी संपर्क करतात, त्यानंतर अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतात, अशी चर्चा आहे. या प्रक्रियेत तिघांचाही फायदा होत असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे बिल्डरांचा खर्च कमी होतो म्हणून महावितरणच्या ठेकेदाराला काम मिळते आणि अधिकारीवर्गाला लक्ष्मीदर्शन होतो म्हणून अशा या एनएससी योजनेच्या चक्रात तिहेरी फायदा पहायला मिळत आहे. मात्र, शासन यांच्यात तोट्यात जातोय, हेही तेवढेच सत्य आहे.
भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती गठीत
पेण भाजपच्या शिष्टमंडळाने 16 जून रोजी अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड यांना निवेदन देऊन एनएससी आणि आरडीएसएस या योजनांमध्ये उपकार्यकारी अभियंता सिध्दार्थ खोब्रागडे यांनी भ्रष्टाचार केल्याचे नमूद केले होते. याबाबत काय कारवाई केली, याची विचारणा करण्यासाठी भाजप शिष्टमंडळ गेले असता धनराज बिक्कड यांनी सांगितले की, चार सदस्य चौकशी समिती गठीत केली असून, येत्या आठ दिवसांत दोन्ही योजनांची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल.






