| मुंबई | प्रतिनिधी |
महायुतीच्या नेत्यांनी बुधवारी (दि. 4) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांच्या एकूण 237 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात आले. त्यानुसार गुरुवारी (दि. 4) देवेंद्र फडणवीस राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. यावेळी महायुतीमधील काही आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात येणार आहे.
दरम्यान, राजभवनात दाखल होण्यापूर्वी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. त्यानंतर हे तिन्ही नेते सत्तास्थापनेसाठी एकाच गाडीतून राजभवनाकडे रवाना झाले. त्यांनी सत्तास्थापनेचा दावा करणारे पत्र राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना सादर केले. यावेळी प्रफुल्ल पटेल, रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, उदय सामंत, धनंजय मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे, रवींद्र चव्हाण, विनय कोरे, प्रसाद लाड यांच्यासह केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन, भाजप नेते विजय रूपाणी उपस्थित होते.
भाजप विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी (दि.4) सर्वानुमते निवड झाली. विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्या 5 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे.
फडणवीस तिसर्यांदा होणार मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस तिसर्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. याआधी त्यांनी 2014 ते 2019 अशी सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले होते. त्यानंतर 2019 ला त्यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटेला शपथ घेतली होती. मात्र, ते सरकार औटघटकेचे ठरले होते. आता फडणवीस तिसर्यांदा शपथ घेणार आहेत. नव्या सरकारचा शपथविधी मुंबईतील आझाद मैदानावर गुरुवारी (दि.5) सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे.