। मुंबई । वृत्तसंस्था ।
आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला जोरदार फटका बसणार असण्याचा अंदाज एका सर्वेत करण्यात आला आहे. या सर्वेनूसार, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी जोरदार मुसंडी मारेल. विरोधकांच्या या आघाडीला सत्ताधारी महायुतीपेक्षा 4 टक्के जादा मते मिळतील. यामुळे सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट व शिवसेनेच्या शिंदे गटात एकच खळबळ माजली आहे.
नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुकीत 3 राज्यांत भाजपने जबरदस्त यश मिळवले. या विजयामुळे भाजप नेत्यांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. विशेषतः या यशानंतर लोकराभा निवडणुकीतही भाजपला यश मिळून नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील, असा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सी व्होटर्सने केलेल्या सर्वेत महाराष्ट्रात मविआला चांगले यश मिळणार असल्याचा दावा केला आहे.
कुणाला किती मिळणार जागा? सी व्होटरच्या सर्वे नुसार, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, सत्ताधारी महायुतीला अवघ्या 19 ते 21 जागांवर समाधान मानावे लागेल. इतर पक्षांच्या वाट्याला 0 ते 2 जागा जातील. मतांच्या टक्केवारीतही या निवडणुकीत महाविकास आघाडी वरचढ ठरण्याचा दावा या सर्वेत करण्यात आला आहे. त्यानुसार, मविआला 41, तर महायुतीला 37 टक्के मतदान पडेल. तर 22 टक्के मते इतर पक्षांत विभागली जातील. सी व्होटर्सच्या या सर्वेत आगामी लोकसभा निवडणुकीत पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या 5 राज्यांतील निकाल धक्कादायक ठरण्याचा दावाही करण्यात आला आहे.






