शिंदेंच्या आमदारांवर महायुतीची नाराजी

। मुंबई । प्रतिनिधी ।

महायुती सरकारमध्ये मंत्रीपदांवरून धुसफुस कायम आहे. अधिकच्या मंत्रीपदांसाठी अडवणूक करणार्‍या शिंदे गटाबद्दल भारतीय जनता पक्षासह अजित पवार गटातील आमदारही नाराजी व्यक्त करत आहेत. इतकेच नव्हे तर शिंदे गटातच आपापसात यावरून वाद निर्माण झाले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आणि आपल्याच आमदारांची कामे टाळणार्‍या मंत्र्यांना पुन्हा मंत्रीपद देऊ नका, असा सूर शिंदे गटासह भाजप आमदारांमध्येही उमटत आहे.

शिंदे गटाकडे 57 आमदार असल्याने हायप्रोफाईल खात्यांसह अधिकची मंत्रीपदेही मिळावीत यासाठी एकनाथ शिंदेंची धडपड सुरू आहे. परंतु, अनेक मंत्र्यांबद्दल शिंदे गटातील आमदारांचीच तक्रार असल्याने त्या मंत्र्यांना पुन्हा मंत्रीपद देण्यास भाजपकडूनही विरोध होत आहे. त्यात अब्दुल सत्तार, संजय राठोड, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे यांच्यासह केसरकर यांचा समावेश आहे. त्यांनी मंत्रीपदावर असताना आपली कामे जाणीवपूर्वक रखडवली, असा आमदारांचा आरोप आहे.

Exit mobile version