अलिबागच्या गद्दाराला शिवसेनेत जागा नको; संवादयात्रेत एकमुखी मागणी

। अलिबाग । प्रतिनिधी ।
सध्या राज्यात घाणेरडे राजकारण सुरु आहे. ही लोकशाही न पटणारी आहे. शिवसेनेतील अनेकांनी गद्दारी करुन सत्ता स्थापन केली. मात्र आजच्या परिस्थितीत अनेकांना शिवसेनेसोबत गद्दारी केल्याचे दुःख होत आहे. त्यामुळे ज्यांना घरवापसी करावीशी वाटेल, त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे कायम खुले असतील, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संवाद यात्रेत केले. यावेळी अलिबागच्या गद्दाराला शिवसेनेत जागा नको, अशी एकमुखी मागणी उपस्थित शिवसैनिकांनी केली. अलिबाग शहरातील भाजप कार्यालयासमोर बुधवारी (दि.17) शिवसंवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी खा. अनंत गीते, आदेश बांदेकर, आ. राजन साळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, तालुकाप्रमुख शंकर गुरव, शहरप्रमुख शैलेश पालकर तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापुढे ठाकरे यांनी सांगितले की, गद्दारांनी जनतेचा विश्‍वासघात केला. स्वार्थासाठी त्यांनी गद्दारी केली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. मात्र त्यावेळी शिवसेनेने आपला भगवा, आपली भूमिका, तत्व बदलली नाहीत. शिवसेनेचे हिंदूत्व म्हणजे वाद मिटवून संवादाने पुढे जाणारे, लोकसेवा करणारे हिंदूत्व आहे. मात्र आत्ताचे सरकार हे घटनाबाह्य, गद्दारांचे सरकार आहे, आणि ते कोसळणारच,असा दावाही त्यांनी केला.

शिवसेनेसोबत गद्दारी करणार्‍या त्या 40 जणांना पक्षाने, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गरजेपक्षा आणि लायकीपेक्षा जास्त दिले म्हणून त्यांनी गद्दारी केली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी रोखठोक सांगितले. ज्यांच्यावर विश्‍वास ठेवला, प्रेम दिलं, मंत्रिमंडळात स्थान दिलं, खाती दिली, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. गद्दारांनी क्रांतीकारी असल्याचे छातीठोकपणे सांगितले. पण या महाराष्ट्राच्या मातीत, शिवरायांच्या भूमीत खोटं बोलून चालणार नाही. कारण ते गद्दार होते आणि गद्दारच राहणार, असेही ते म्हणाले.

गद्दारी करुन रायगडला काय मिळालं?
रायगडच्या तीनही आमदारांनी गद्दारी केली. मात्र गद्दारी करुन रायगडला काय मिळालं? असा प्रश्‍न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. गद्दारी करुन रायगडच्या गद्दारांंची झोळी रिकामी तर मंत्रिमंडळात जागा मिळालेल्यांना दुय्यत दर्जाची खाती मिळाली आहेत. गद्दारांबद्दल राग नाही तर दुःख आहे. कारण एका प्रामाणिक मुख्यमंत्र्यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला. हे सरकार महाराष्ट्राला मागे खेचण्याचे काम करीत आहे. गद्दार राज्याचे पाच तुकडे करतील. वाद, दंगली घडतील. यामध्ये जनता होरपळून निघेल, याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.

ठाकरे कुटूंबियांना राजकारणातून बाहेर काढण्याचे स्वप्न
ठाकरे कुटूंबिय चार पिढ्यांपासून समाजकारण करीत आहे. समाजकारणासाठीच राजकारणात ठाकरे आहेत. अनेकदा ज्येष्ठांनी सांगितले की, राजकारण ठाकरे कुटूंबियांचे काम नाही. चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नाही. पण ठाकरेंसाठी जनतेचा शाश्‍वत विकास, लोकसेवा हेच राजकारण आहे. त्यामुळे समाजकारणासाठी राजकारणात ठाकरेंनी स्थान निर्माण केले. चांगल्या कामामुळेच आज कार्यकर्ते ठाकरे कुटूंबियांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे ठाकरे कुटूंबियांना राजकारणातून बाहेर काढण्याचे गद्दारांचे स्वप्न कधीही पुर्ण होणार नाही.

भाजप कार्यालयासमोरच शिवसेनेचा ‘संवाद
आपल्या कार्यालयालयासमोर सभा घेण्यामागे कोणतेही कारण नाही. सर्वांची माती, ध्येय एकच आहे. वाद, दंगली करणं हे शिवसेनेचं राजकारण नाही. त्यामुळे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितले. तसेच कार्यक्रम संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेची शिस्त पाळण्याचे आवाहनही त्यांनी केले.

39 दिवसांनी सापडले लायक मंत्री
गद्दारी करुन ज्यांनी मुंख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; त्यांना मंत्रिमंडळ स्थापन करायला 39 दिवस लागले. तर खातेवाटप करण्यासाठी पाच दिवस विचार करायला लागला. याचाच अर्थ मुंख्यमंत्र्यांना 39 दिवसांनी लायक असेलेले ते 18 लोकं सापडले. या मंत्रिमंडळात गद्दारी करणार्‍या रायगड, मुंबईमधील मंत्र्यांना कुठेही जागा दिली नाही. याशिवाय महिलांनाही डावलण्यात आले. या सरकारमध्ये निष्ठेला कुठेही स्थान नाही.

Exit mobile version