| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबागचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी महावितरणच्या अभियंत्याला शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. वीज बिल वसूल करू नका म्हणून दळवींनी धमकवल्याचे समोर आले आहे. सदर सहायक अभियंताने आमदार महेंद्र दळवी यांच्या सोबतचे कॉल रेकॉर्ड समाज माध्यमावर व्हायरल केले आहे. महेंद्र दळवी यांच्या या कृत्याबद्दल महावितरण च्या अधिकाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.
आमदार महेंद्र दळवी यांनी मुरुड येथील सहायक अभियंता राठोड यांना फोन लावला. लोकांना सध्या व्यवसाय करु द्या. सध्या वीज बिल वसुली करु नका. पाच जानेवारीपर्यंत वसुली थांबवा, असे आमदार दळवी यांनी सांगितले. राठोड यांनी ते माझ्या हातात नाही, वरिष्ठांच्या हातात असल्याचे सांगितले. त्यानंतर आमदार दळवी यांनी मुलानी साहेबांना फोन लावला. त्यांना म्हटले की, तुमचा राठोड अधिकारी आहे. आता मी माझ्या लोकांना आदेश दिला आहे, त्याला मारा. त्याला बदला किंवा मी त्याला मारेल. उद्या माझी लोकं त्याला ठोकणार आहे. त्याचा मर्डर अटळ आहे. त्याला आमदाराशी कसे बोलावे माहीत नाही. त्याची भाषा चांगली नाही.
आमदार महेंद्र दळवी आणि मुलानी यांच्या या कॉन्फरन्स कॉलमध्ये राठोड सुद्धा होते. त्यांनी तुमचे आणि माझे बोलणे कधी झाले, असे आमदार दळवी यांना विचारले. त्यावर दळवी यांनी तुम्ही बदली करुन घ्या, असे स्पष्टपणे सांगितले. ते माझ्या हातात नाही. माझी बदली झाली तर माझ्यासाठी चांगले आहे. परंतु बदली माझ्या हातात नाही, असे दळवी यांना सांगितले. त्यावर आमदार दळवी यांनी मुलानी यांना म्हटले की, उद्याच्या दिवस तुम्ही काही बोलू नका. पोरांना त्याला मारायला लावतो. मग बदली होईल. या प्रकरणामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.