जिद्दीच्या जोरावर महेंद्रची यशाला गवसणी

चणे-फुटाणे विकून सांभाळतोय कुटुंबाचा डोलारा

। चौल । प्रतिनिधी ।

व्यवसायाची जिद्द आणि चिकाटी व मेहनत घेण्याची इच्छाशक्ती असली, की व्यवसायात मोठी झेप घेता येते. हे रेवदंड्यातील महेंद्र वाडेकर या तरुणाने दाखवून दिले आहे. चणे-फुटाणे विकणार हा तरुण आज याच व्यवसायात यशस्वी झाला असून, संपूर्ण कुटुंबाचा भार स्वतःच्या खांद्यावर पेलत आहे. त्याचे काका रवींद्र वाडेकर यांचेही या व्यवसायात मोलाचे सहकार्य असल्याचे त्याने निक्षून सांगितले.


वाडेकर कुटुंबाचे महेंद्र चणा मार्ट हे रेवदंडा येथे 40 वर्षांपासून चणे-फुटाणे विक्रीचे दुकान आहे. आपल्या कुटुंबियांनी सुरू केलेला व्यवसाय त्यांची दुसरी पिढीसुद्धा तितक्याच मेहनतीने पुढे नेत असल्याने महेंद्र या तरुणाच्या कष्टातून दिसून येते. आईवडिलांच्या निधनानंतर लहानपणीच व्यवसायाची जबाबदारी महेंद्रवर पडली. सकाळी उठून दुकान लावण्यापासून चणे-वाटाणे, शेंगदाणे भाजण्यापर्यंत सर्व कामे सफाईदारपणे करताना पाहून नवल वाटते. याबाबत त्याला विचारले असता, कोणताही व्यवसाय लहान-मोठा नसतो, तो फक्त आणि फक्त व्यवसाय असतो. तुम्ही करीत असलेले प्रत्येक काम सन्मानजनक असते, असे उत्तर त्याने दिले. दुकानासाठी लागणारा सर्व कच्चा माल वाशी येथील मार्केटमधून आणण्यात येतो, असे त्याने सांगितले. महेंद्रचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. परंतु, व्यवसाय करत असताना शिक्षण आड येत नसल्याचे सांगितले.

नागपंचमीला कडधान्य भाजण्याची परंपरा
हिंदू धर्मियांचा श्रावणातील पहिला सण नागपंचमी. हा सण शुक्रवारी (दि. 9) साजरा होणार आहे. त्यानिमित्त पंचक्रोशितील शेतकरी आपल्या शेतात पिकविलेले कडधान्य भाजण्यासाठी भट्टीवर येतात. मागील चार दिवसांपासून सकाळपासून रात्रीपर्यंत हे काम सुरू असल्याचे महेंद्रने सांगितले. व्यवसाय करण्याची जिद्द आणि गिर्‍हाईकाचे मन जिंकता आले की कोणतीच अडचण येत नसल्याचे महेंद्र म्हणाला.
काकाची मदत मोलाची
सणासुदीच्या काळात धंदा म्हटले की घरची माणसे असतील तेवढी कमीच. काका रवींद्र वाडेकर याची मदत मोलाची आहे. महेंद्र चणामार्टचा डोलारा उभारण्यात काकाचीच मेहनत, कष्ट मोठे आहेत. अलिबाग, कुरुळ, हटाळे, सहाण आदी ठिकाणच्या आठवडा बाजारात चणे-फुटाणे विक्रीचे दुकान लावण्यात येते. गणपती विसर्जनस्थळी, नवरात्रोत्सवात भरणार्‍या यात्रांमध्ये चणे विक्रीचा व्यवसाय करतो. या सर्व धावपळीत काकाची साथ लाभते.
Exit mobile version