कर्जत-नेरळ पोलीस ठाण्यात महिला राज

सर्व दैनंदिन कामांवर महिलांचे लक्ष
महिला दिनी महिला पोलिसांना बहुमान

। नेरळ । वार्ताहर ।
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा सन्मान करण्यासाठी पोलीस दलाने सर्व कारभार महिला पोलिसांच्या हाती दिले होते. कर्जत आणि नेरळ पोलीस ठाण्यात महिला पोलिसांनी अगदी चोख कामकाज करीत सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले.

पोलीस दलात काम करणार्‍या महिलांचा सन्मान राखला जावा आणि त्यांनी नव्या उमेदीने कामकाज पहावे यासाठी कर्जत आणि नेरळ पोलीस ठाण्यात महिला पोलिसांनी सर्व कामकाज हाती घेतले आणि यशस्वीपणे पार पाडले. कर्जत पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सुवर्णा पत्की या महिला अधिकारी असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यामधील सर्व कामकाज महिला कर्मचारी यांनी पाहिले. त्यात कर्जत पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदार म्हणून स्वाती मसगुडे यांनी तर वायरलेसची जबाबदारी पूनम ढोमे यांनी पार पाडली. यावेळी सीसीटीएनएस प्रणालीवर संजना सांगळे यांनी तर दामिनी पथकाची जबाबदारी जया खंडागळे यांनी सांभाळली. गोपनीय विभाग श्रुती भोईर यांनी तर शहर आणि परिसरातील बंदोबस्त संचिता सानप, दीपा खडे आणि ज्ञानिवंता बारोळे आणि स्वाती चिरमे यांनी सांभाळली. कर्जत पोलीस ठाणे सारख्या मोठ्या पोलीस ठाण्यात आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त येथील दैनंदिन कामकाज यशस्वीपणे सांभाळले.

नेरळ पोलीस ठाणे आणि आऊट पोस्ट पोलीस ठाणे येथे देखील महिला पोलिसांच्या हाती सर्व कामकाज होते. नेरळ पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी काम पाहिले, त्यांना ठाणे अंमलदार म्हणून अनघा पाटील, सीसीटीएनएस प्रणालीवर सोनू मेश्राम यांनी तर वायरलेस ची सेवा महिला पोलीस शिपाई जयाबाई सांगळे यांनी सांभाळली. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी असलेल्या दामिनी पथकाची जबाबदारी प्रीती वर्तक आणि वर्षा पाटील तर लॉकअप बंदोबस्त मोहिनी वाघमोडे आणि बंदोबस्तात रुतीका कदम आणि पुष्पा वाघमारे यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्याचवेळी कळंब येथील आऊट पोस्ट वरील प्रभारी म्हणून महिला पोलीस हवालदार विद्या राठोड यांनी कामकाज पाहिले.

नेरळ पोलीस ठाणे आणि विद्या विकास शाळा यांच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नेरळ गावात प्रभातफेरी काढून शुभेच्छा दिल्या. दिवसभर नेरळ पोलीस ठाण्यातील पुरुष अधिकारी आणि कर्मचारी यांनी दाखल असलेल्या गुन्ह्यातील वेगवेगळ्या तपासात पोलीस स्टेशन बाहेरचे कामकाज पाहिले. यावेळी महिला दक्षता समितीच्या सदस्या सुमन लोंगले, कल्पना हिलाल, रेखा हिरेमठ यांनी पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे पोलीस ठाण्यात उपस्थित राहून कौतुक केले.

Exit mobile version