| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची महिला सन्मान योजना शासनाने महिला प्रवाशांना एसटी बसच्या सर्व प्रकारच्या तिकिटांवर पन्नास टक्के सवलत देणारी योजना आहे. या योजनेचा लाभ महिला वर्गाला मिळतोय. परंतु, ही योजना फक्त तिकीटा पुरती मर्यादित असल्याचे दिसून येते. शनिवारी 31 जानेवारी रोजी श्रीवर्धन आगाराच्या डोंगरी मुंबई-श्रीवर्धन या बसमध्ये श्रीवर्धन येथील तन्वी बाक्कर यांनी माणगाव स्थानकात श्रीवर्धन गावात येण्यासाठी वाहकाकडून तिकीट घेतले. परंतु, बस श्रीवर्धन स्थानक येथे येताच चालकाने बस गावात जाणार नाही असे सांगत प्रवाशांना खाली उतरवले. तिकीट गावातील काढले आहे असा प्रवासी वर्गाने खुलासा करून ही चालकाने बस गावात नेण्यास नकार दिला. यावेळी वाहकाने ही गावातील फेरी बाबतीत चालकाला कुठलीच सुचना न दिल्याने प्रवासी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. सुट्टीच्या दिवसात श्रीवर्धन बाजारपेठेत व इतर मार्गावर पर्यटकांची वाहने उभी असल्याने बस गावातून नेण्यास त्रासदायक होते व बस मुळे काही वेळा वाहतूक कोंडी होऊ शकते. या कारणास्तव सुट्टीच्या दिवसात बसची गावातील फेरी बंद करण्यात येते असा खुलासा श्रीवर्धन बसस्थानक व्यवस्थापनाने केला आहे.






