भाऊसाहेब भिलारे चषक कबड्डी स्पर्धेत महिंद्रा संघाचा पराभव

। पाचगणी । प्रतिनिधी ।
पाचगणी व्यायाम मंडळ आयोजित पुरुष व्यावसायिक व महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिंद्रा संघाला पहिल्याच साखळी सामन्यात मुंबई महानगर पालिकेने पराभवाचा धक्का दिला. पाचगणीतील बाळासाहेब भिलारे क्रीडानगरीत झालेल्या व्यावसायिक पुरुष अ गटात मुंबई महानगर पालिकेने महिंद्राचा कडवा प्रतिकार 36-30 असा मोडून काढत कबड्डी रसिकांना आश्‍चर्याचा धक्का दिला. ब गटात बलाढ्य भारत पेट्रोलीयमने दुबळ्या हिंदुजा रुग्णालयावर 49-16 अशी मात करत पहिल्या साखळी विजयाची नोंद केली. याच गटात मुंबई बंदर संघाने जे.जे. रुग्णालयाचा 33-9 असा पाडाव केला. क गटात सेंट्रल बँकेने महाराष्ट्र पोलीस संघाचा 33-29 असा पराभव केला. पण त्यानंतर झालेल्या सामन्यात महाराष्ट्र पोलिसांनी रिझर्व्ह बँकेला 24-20 असे चकवीत आपल्या बाद फेरी गाठण्याच्या आशा कायम ठेवल्या. ड गटातील मध्य रेल्वे विरुद्ध सेंट्रल एक्साईज हा सामना 28-28 असा बरोबरीत सुटला.


महिलांच्या ड गटात पुण्याच्या जागृतीने उपनगरच्या महात्मा गांधीला 32-26 असे रोखले. याच गटात पुण्याच्या एम. डी. स्पोर्ट्सने मुंबईच्या गोलफादेवीचा 45-17 असा पाडाव केला. अ गटात मुंबईच्या शिवशक्तीने सातारच्या शिवाजी उदयला 42-13 असे चितपट केले. ब गटात उपनगरच्या स्वराज्यने मुंबईच्या स्वामी समर्थला 36-27 असा धक्का दिला. क गटात कोल्हापूरच्या हनुमान-बाचणी मंडळाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करीत मुंबईच्या जिजामाता संघाला 43-19 असे सहज नमवले. या स्पर्धेचे उद्घाटन खासदार श्रीनिवास पाटील व त्यांच्या पत्नी कबड्डी खेळाडू सौ. पाटील यांच्या हस्ते झाले.

Exit mobile version