। कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड, पुई या गावानजिक महिसदरा नदीवर पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. या कामाला 17 वर्षे पूर्ण झाली तरी या कामात कोणतीही प्रगती नाही. हे काम मे 2025 पर्यंत पूर्ण करण्याच्या इराद्याने सुरु आहे.
हे कामनिकृष्ट दर्जाचे होत असल्याचे येथील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर या कामाच्या ठिकाणी जाऊन या कामाची पाहणी केली. यावेळी सिद्धार्थ गायकवाड, अशोक धामणसे, आत्माराम दिवेकर, सखाराम सावंत आदी पुई ग्रामस्थांनी महिसदरा पुलाच्या बाजूला जाऊन पाहणी केली असता महामार्गावरील पहिली टाकलेली डांबर खोदकाम न करता त्यावर मलमपट्टी म्हणून सिमेंट काम सुरु केले आहे. याबाबत विचारणा केली असताना येथील कामगार म्हणतात आम्हाला काहीच माहिती नाही. आम्हाला फक्त जुना रोड साफ करून साईडपट्ट्या मारून ठेवायला सांगितले आहे.
रोहा तहसीलदार यांना दूरध्वनीवरून संदेश देऊन त्यांच्या निदर्शनास आणले असता रोहा तहसीलदारांनी मला भेटा असे सांगितले. सिद्धार्थ गायकवाड व त्यांचे कार्यकर्ते तहसीदार यांना भेटणार असून यानंतर हे काम असेच सुरु राहिले तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सिद्धार्थ गायकवाड यांनी दिला आहे.