अलिबागमधील मुख्य ध्वजारोहण सोहळा

मंत्री चंद्रकात पाटील यांच्या हस्ते संपन्न

। रायगड । प्रतिनिधी ।

स्वातंत्र्यदिनाच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस परेड मैदानावर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्तेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के आदी उपस्थित होते.

अवघ्या पंधरा दिवसात ईशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लवकरच सिडको मार्फत या जागेचा विकास करण्याची निविदा प्रक्रिया करण्यात येईल. अवघ्या तीन दिवसात जीवनावश्यक वस्तूंसह तात्पुरते पुनर्वसन आणि 15 दिवसात कायमस्वरूपी पुनर्वसन प्रक्रिया अंतिम टप्प्यात ही अतिशय कौतुकास्पद बाब असल्याचेही त्यांना नमूद केले.

डॅड प्रणाली राज्याला मार्गदर्शक
इर्शाळवाडी आपत्तीतून बोध घेऊन रायगड जिल्ह्यातील 103 दरड व आपत्तीप्रवण गावांत 'डॅड' डिझँस्टर अँप्रायझल डेटा ही पंचसुत्रीवर आधारीत अतिशय वैशिष्ट्‌‍यपूर्ण संगणक प्रणाली अंमलात आणली आहे. भविष्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्यातील इतर जिल्ह्यांना ही प्रणाली मार्गदर्शक व उपयोगी ठरेल असे प्रतिपादन मंत्री चंद्रकात पाटील यांनी मंगळवारी (दि.15) अलिबाग येथे केले.

गतिमान शासन व प्रशासकीय यंत्रणांमुळे संकटावर मात करणे शक्य झाले आहे. जिल्ह्यातील या आपत्ती व्यवस्थापन कार्यात विविध व्यक्ती, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रशासनाला मोलाचे सहकार्य लाभले.

मंत्री चंद्रकांत पाटील
गाठीने ध्वज फडकलाच नाही
शासकीय ध्वजारोहण करण्याची वेळ जवळ आली आणि सारे तिरंगा झेंड्याला सलामी देण्यासाठी सज्ज झाले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ध्वजारोहण करण्यासाठी दोरी हातात घेतली आणि खेचून झेंडा फडकविणार आणि राष्ट्रगीत सुरु होणार अशा तयारीत सारे सावधान झाले. पण दोरी खेचूनही झेंडा फडकला नाही. पाटील यांनीही खूप वेळा दोरी खेचली. त्यानंतर तेथे असणाऱ्या एकाने दोरी खेचली परंतु तरीही झेंडा फडकला नाही. यामुळे तिरंगा झेंडा खाली आणला. झेंड्याला मारलेली दोरीची गाठ सोडण्यात आली आणि फडकवलेला झेंडा दोरीने ध्वजस्तंभावर दिमाखात चढविण्यात आला. ध्वजारोहण होण्यापूर्वी पावसाने शिडकाव केल्याने झेंड्याला बांधलेली दोरी ओली होऊन घट्ट झाल्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ध्वज फाकविण्याची दोरी खेचली तेंव्हा ती गाठ सुटली नाही. झालेल्या प्रकाराने सारे अवाक झाले होते. थोडा वेळ अनेकांच्या चेहऱ्यावर हे असे कसे घडत आहे. झेंडा बांधणाऱ्याने असे कसे केले, असे अनेक तर्कवितर्क उपस्थितांमध्ये लढविले जात होते.

Exit mobile version