सणांच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक सलोखा राखा

पो.नि. सरिता चव्हाण यांचे आवाहन

। पाली । वार्ताहर ।

आगामी काळातील दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्‍वभूमीवर कायदा सुव्यवस्था, वाहतुकीचे नियोजन व सामाजिक सलोखा राखावा याबाबत आढावा घेण्यासाठी पाली पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक बोलविण्यात आली होती.

गणेशोत्सवाच्या सणात चाकरमानी गावाकडे व कोकणात मोठ्या संखेने येत असतात. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीत प्रचंड वाढ होते. व याचा ताण वाहतूक नियोजनावर येतो. पाली बाजारपेठेतील काही रस्ते अरुंद असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होते. त्यामुळे त्याचे नियोजन व वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचे आहे. यावेळी हटालेश्‍वर देवस्थानचे विश्‍वस्थ राजेश मपारा यांनी चाकरमानी व नागरिकांसाठी हटालेश्‍वर देवस्थानच्या मैदानात पार्किंग उपलब्ध करुन देण्याचे आश्‍वासन दिले. भोईआळी याठिकाणी छोटे व्यावसायिक रस्त्याच्या दुतर्फा दुकान थाटून बसलेले असतात त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होतात, त्यांनादेखील दुसरीकडे स्वतंत्र ठिकाणी व्यवस्था करण्याच्या सूचना नगराध्यक्षा प्रणाली शेळके यांनी केल्या आहेत. तसेच पाली येथे गणेशमूर्ती नेण्यासाठी व इतर सजावटीचे साहित्य घेण्याकरीता गावागावातून लोक येत असतात, तर त्याकरिता कमीत कमी लोकांनी येण्याचे आवाहन देखील पो.नि सरिता चव्हाण यांनी केले आहे. जेणेकरून गर्दी टाळता येईल व नागरिकांना गर्दीचा त्रास होणार नाही. गणपती विसर्जनस्थळी दरवर्षीप्रमाणे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे देखील पो.नि चव्हाण यांनी सांगितले. परळी बाजारपेठेतील रस्त्याच्या दुतर्फा होत असलेल्या वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. त्याबाबतदेखील मराठा समाज अध्यक्ष धनंजय साजेकर यांनी पोलीस प्रशासनाला सूचना केल्या.

पार्किंगसाठी उपलब्ध करुन देण्यात येणारी ठिकाणे
* हटालेश्‍वर देवस्थानचे मैदान पार्किंगसाठी खुले असेल.
* पाली बस स्थानकात पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.
* पाली तहसील कार्यालयाच्या आवारात व पाली पोलीस ठाण्याच्या पुढील मोकळ्या मैदानातदेखील नागरिकांना वाहने पार्किंग करता येतील.
* रामआळी रोडवर जुने पोलीस स्टेशन याठिकाणी देखील नागरिकांना वाहने पार्किंग करता येतील.
* भक्तनिवास पार्किंगबरोबरच पालीवाला महाविद्यालयाचे मैदान पार्किंगसाठी खुले करण्यात येईल.
Exit mobile version