क्रीडा संकुलाची होणार देखभाल दुरुस्ती; आ. जयंत पाटील यांच्या मागणीची दखल

क्रीडामंत्र्यांकडून दीड कोटी रुपये देण्याचे आश्वासन

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुरवस्थेबाबत आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी सभागृहात आवाज उठवला. संकुलाच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी केली. त्यानुसार निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे आश्वासन क्रीडामंत्र्यांनी दिले. त्यामुळे लवकरच अलिबागमधील जिल्हा क्रीडा संकुलाची दुरुस्ती होणार आहे.

अलिबाग तालुक्यातील नेहुली येथे अकरा एकर जागेवर जिल्हा क्रीडा संकुल बांधण्यात आले आहे. खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी खेळाचे मैदान, वसतीगृह, संरक्षक भिंत, विद्युतीकरण, क्रीडा साहित्य आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र या क्रीडा संकुलाचा वापर निवडणूकांसाठी व कोविड केंद्रासाठी करण्यात आला आहे. या संकुलाची दुरवस्था झाली आहे. परिसरात गवत वाढले असून विविध खेळाचे साहित्य धूळ खात आहे. प्रेक्षक गॅलरी देखभाल दुरुस्तीपासून वंचित आहे. त्यामुळे खेळाडू अनेक सुविधांपासून वंचित असल्याचे आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी विधानपरिषदेतील सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. क्रीडा संकुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समिती व अन्य शासनाच्या योजनेच्या मार्गाने दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करावा. तसेच, जिल्हयातील अन्य क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी केली. त्यांच्या या मागणीला दुजोरा देत क्रीडामंत्र्यांनी सांगितले की, क्रीडा संकुलाचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे संकुलाच्या अनुदान मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. या संकुलाला सुमारे दीड कोटी रुपये अनुदान दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यासाठी लागणारे आराखडे, अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले.

अन्य क्रीडा संकुलावरही वेधले लक्ष
रायगड जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलासाठी योग्य जागा न मिळणे, अपुरा निधी यामुळे तालुका क्रीडा संकुले समस्यांच्या फेऱ्यात सापडले असल्याबाबत आ. जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर क्रीडा मंत्र्यांनी सांगितले, पेण, रोहा, माणगाव, पनवेल, व सुधागड या पाच तालुक्यात क्रीडा संकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. महाड, खालापूर व कर्जत या तालुका क्रीडा संकुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत. उरण, मुरुड, पोलादपूर येथील क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरु आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
क्रीडाप्रेमींसह खेळाडूंकडून आ. जयंत पाटील यांचे अभिनंदन
रायगड जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रश्नांबाबत आ. जयंत पाटील यांनी आवाज उठवून सभागृहाच्या निदर्शना आणून दिले. त्यांच्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करून त्यासाठी लागणारे निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन क्रीडामंत्र्यांनी दिले. आ. जयंत पाटील यांनी खेळांडूंच्या या प्रश्नांबाबत आवाज उठवल्याने क्रीडा प्रेमी व खेळाडूंकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
Exit mobile version