50 ते 60 मजूर अडकल्याची भीती
। उत्तरकाशी । वृत्तसंस्था ।
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शक्यता नाकारता येत नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली 50-60 मजूर अडकल्याची माहिती आहे. उत्तराखंड सरकार आणि प्रशासनाच्या पथकांनी बचावकार्य सुरू केले आहे. आतमध्ये कामगारांसाठी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. बोगद्याच्या आत एक अतिरिक्त ऑक्सिजन पाईप देखील देण्यात आला आहे. बोगद्यात सर्व कामगार सुरक्षित आहेत. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून सिल्क्यराकडे जाणाऱ्या 200 मीटर अंतरावर हे भूस्खलन झाले, तर बोगद्यात काम करणारे कामगार प्रवेशद्वाराच्या 2800 मीटर आत होते.
घटनेची माहिती मिळताच उत्तरकाशीचे पोलिस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्याची जबाबदारी घेतली. पोलिस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, आपत्कालीन 108 आणि राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड, बोगदा बांधणारी संस्थेचे कर्मचारीही घटनास्थळी बोगदा उघडण्यात व्यस्त आहेत.