बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान यशस्वी करा – एकात्मिक बालविकास सेवा योजना

आयुक्त रुबल अग्रवाल यांचे आवाहन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत महिला व बालविकास क्षेत्रात काम करण्याची आपल्या सर्वांना उत्तम संधी मिळाली आहे. या संधीद्वारे शासनाने दिलेली उद्दिष्टे सर्वांनी मिळून पूर्ण करूया आणि हे अभियान यशस्वी करुया, असे आवाहन एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल यांनी अलिबाग येथे केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी कर्मचार्‍यांसाठी जिल्हास्तरीय पोषण अभियान व बेटी बचाओ..बेटी पढाओ कार्यशाळेचे आयोजन जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हाधिकारी तथा पोषण अभियान अध्यक्ष डॉ.महेंद्र कल्याणकर, अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मंडलिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनित म्हात्रे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अशोक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्रामीण विकास आरोग्य यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ.ज्ञानदा फणसे, शिक्षणाधिकारी ज्योती शिंदे-पवार, स्वदेश फाऊंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक तुषार इनामदार, बालविकास प्रकल्प अधिकारी चेतन गायकवाड, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आदी उपस्थित होते. यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सर्वप्रथम जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे त्यांनी या कार्यशाळेसाठी स्वत:हून पुढाकार घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच पोषण आहार उत्कृष्ट सहभागाबद्दल रायगड जिल्ह्याचा पहिला क्रमांक आल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.

रायगड जिल्ह्याचा मुलींचा जन्मदर अत्यंत समाधानकारक आहे. 1000 मुलांच्या मागे 949 वरून ते हे प्रमाण 977 झाले आहे, ही बाब कौतुकास्पदच आहे. हे प्रमाण अधिक होण्यासाठी प्रयत्न करूया. दि.1 मार्च ते 15 ऑगस्ट या कालावधीत कुपोषणमुक्त जिल्हा हे अभियान काटेकोरपणे नियोजन करून यशस्वी करायचे आहे. – रुबल अग्रवाल, आयुक्त

कुपोषणमुक्त रायगड करा
सध्याच्या आकडेवारीवरून रायगड जिल्ह्यात फक्त 98 कुपोषित बालके आहेत. ही बाब चांगली आहे. तरीही येथील बालकांची पुन्हा तपासणी करून कुपोषणमुक्त रायगड हे अभियान यशस्वी करूया. जिल्ह्यातील अंगणवाड्यांसाठी सर्व प्रकारचे सहकार्य जिल्हाधिकार्‍यांकडून दिले जावे,असे सुचित केले. यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविकांनी कुपोषणमुक्तीवर आधारित सादर केलेल्या कहाणी स्वर्ण देशाची या पथनाट्य सादरीकरणाचेही कौतुक केले.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, या पोषण आहारामुळे आजची पिढी सशक्त, सुदृढ दिसून येत आहे. रायगडचे काम तर उल्लेखनीय आहे. शहरी व ग्रामीण भागातील शासकीय दवाखान्यात सर्व प्रकारची औषधे आपल्याला उपलब्ध आहेत,असे आश्‍वस्त केले. जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी पोषण अभियान कार्यक्रमात रायगड जिल्ह्याला पहिला क्रमांक मिळाल्याबद्दल सर्व यंत्रणांचे तसेच आयुक्त रुबल अग्रवाल यांना मानाचा डॉ.अरुण बोंगिरवार सर्व्हिस एक्सलन्स अवार्ड मिळाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले.

जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जास्तीत जास्त जनजागृती करूया, बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानाच्या माध्यमातून गर्भलिंग तपासणी प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करूया, कर्तव्य भावनेतून पुढील पीढी सशक्त पीढी म्हणून तयार होण्यासाठी प्रयत्न करूया. – डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी मनोगत व्यक्त केले. अंगणवाडी सेविकांनी स्वागत गीत व क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित ओवी गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. कुपोषणमुक्तीवर आधारित कहाणी स्वर्ण देशाची हे पथनाट्य सादर केले. निमित्ताने गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, बालके व किशोरवयीन मुली यांच्या आरोग्याची नियमितपणे घ्यावयाची काळजी व उपाययोजना तसेच महिला व मुलींकरिता शासकीय योजनांबद्दलच्या माहितीपर घडीपुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मंडलिक यांनी तर सूत्रसंचालन अमरदीप ठोंबरे यांनी केले.

Exit mobile version