सांगोलामध्ये हर घर तिरंगा अभियान यशस्वी करा – मुख्याधिकारी

| सांगोला | प्रतिनिधी |
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी सांगोला नगरपरिषदेकडून हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत असून याअंतर्गत शहरात एकूण 6000 राष्ट्रध्वज उभारण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.

मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर तिरंगा हा उपक्रम जनमानसात पोहोचविण्याच्या करिता सांगोला नगरपरिषदेकडून अत्यंत सूक्ष्म नियोजन केले असून उपक्रमाचा प्रचार, प्रसार तसेच झेंड्याची उपलब्धता अशा दुहेरी आघाड्यांवर काम सुरू आहे.शाळा,महाविद्यालय, बँकां, बचत गट, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना व विविध आस्थापना यांच्या बैठका घेऊन झेंडे खरेदीसाठी त्यांची मदत घेणे तसेच अभियानाला संपूर्ण शहरात पोहचविण्यासाठी ङ्गतिरंगा व्होलेनटीयरङ्घ यांची नियुक्ती करण्याचे नगरपरिषद मार्फत नियोजन करण्यात आले आहे. प्रभातफेरी, पथनाट्ये, पोवाडे अश्या पारंपरिक पद्धती बरोबरच समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून अभियानाचा प्रचार, प्रसार करणार असल्याची माहिती मुख्यअधिकारी केंद्रे यांनी दिली.

हर घर तिरंगा अभियानाच्या प्रभावी अंमलजावणीसाठी मुख्याधिकारी यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तिरंगा टास्क फोर्स गठीत केली असून यात लेखापाल विजयकुमार कहेरे, योगेश गंगाधरे, अमित कोरे, नयन लोखंडे, शरद चव्हाण, बिरप्पा हाके यांचा समावेश आहे.विविध घटकांच्या आढावा बैठका घेणे,तिरंगा व्होलेनटीयर यांच्या नेमणुका करणे, अभियानात जास्तीत जास्त नागरिकांना जोडणे याची जबाबदारी या तिरंगा टास्क फोर्सवर सोपविली असल्याची माहिती केंद्रे यांनी दिली.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या आठवणी जाग्या करून देशाभिमान जागृत करण्यासाठी सांगोला शहरातील प्रत्येक नागरिकाने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर, दुकानावर, शासकीय तसेच खाजगी कार्यालयांवर ध्वज संहितेचे पालन करून तिरंगा फडकवून हर घर तिरंगा अभियान यशस्वी करायचे आहे.

– कैलास केंद्रे, मुख्याधिकारी



Exit mobile version