जगदीश संसारे यांचे प्रतिपादन
। अलिबाग । वार्ताहर ।
राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर भारत सरकार उपक्रमाच्या अलिबाग,थळ येथील स्थानिय लोकाधिकार समितीच्या वतीने मराठी राजभाषा दिन सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात जगदीश संसारे म्हणाले, मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार जोरदार करायचा असेल तर आपण दैनंदिन जीवनात मराठीचा अधिकाधिक वापर करायला हवा. तसेच अमराठी भाषिकांबरोबर मराठीत बोलून त्यांना आपल्या मराठी भाषेची सवय लावायला हवी असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमावेळी आर.आर.कुलकर्णी, अनिरुद्ध खाडिलकर, संजय शिंदे, माधवी पवार, प्रा. जाई म्हात्रे, श्रुतिका घोलप, संजय धारिया, अभय घरत,संतोष घरत,पवन पाटील,श्री मोरे, विनायक पाटिल, पांडुरंग सोनार, ठोकळ, एस.व्ही.कुलकर्णी, विनायक पाटील हे मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
मराठी भाषा दिनानिमित्त निबंध स्पर्धा तसेच प्रश्नमंजुषा कार्यक्रम आयोजित करण्यात आली होता. निबंध स्पर्धेला कर्मचारी, प्रशिक्षणार्थी यांच्यासह कुटुंबियांनी देखील प्रतिसाद दिला. यामध्ये कर्मचारी गटात पूजा म्हात्रे हिने प्रथम, योगेश पाटील यांचा द्वितीय क्रमांक तर अल्पना भिवरे आणि सौरभ चौधरी यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले. प्रशिक्षणार्थी गटात प्रथम अंकिता खंडागळे, द्वितीय प्रांजली म्हात्रे आणि तृतीय क्रमांक कोमल कवळे यांना देण्यात आला. तसेच परिवार गटात प्रथम क्रमांक प्रीती रोकडे, द्वितीय भाग्यश्री राऊत तृतीय अर्पिता घरत यांना पारितोषिक मिळाले.






