नुकसानीचे सरसकट पंचनामे करा- चित्रलेखा पाटील


। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीने नागरिकांसह शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पंचनामे करताना नुकसानीचे सरसकट करण्यात यावे, अशी मागणी शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यांनी केली आहे.

रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर सुरु राहिल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले.पावसामुळे पनवेल तालुक्यातील तोंडरे येथील काही घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. अलिबाग तालुक्यातील नागाव, बुरूमखाण, चौल, नेहुली, मुळे, बामणोली, राजमळा, महाजने, रामराज, भिलजी बोरघर, पेझारी या गावांमधील काही घरांमध्ये पाणी शिरले. घरातील अनेक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले. पशुधनाचीदेखील मोठी हानी झाली आहे. भातांची रोपेदेखील पाण्याखाली आल्याने नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकर्‍यांसह जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत.

याबाबत चित्रलेखा पाटील यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी दिल्या. तेथील ग्रामस्थ, शेतकरी व महिलांची समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्नदेखील केला. तसेच त्यांनी गरजूंना आर्थिक मदतीचा हात दिला. दरम्यान, प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, नुकसान झालेल्या मोजक्याच वस्तूंचे पंचनामे न करता सरसकट पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

Exit mobile version