घरपोच सुविधा देणारे रस्ते करा

नवीन रस्ते करण्याआधी सोयीसुविधा द्या
भंडारवाडा परिसरातील नागरिकांची मागणी
| मुरूड | प्रतिनिधी |
मुरूड शहरातील भंडारवाडा व कोळीवाडा शिवाजी नगर परिसरात अरुंद रस्त्यांमुळे रुग्णवाहिका, अग्निशमन गाडी व आपत्कालीन सुविधा प्रत्येक नागरिकाला मिळत नसल्याने नवीन रस्ते करण्याआधी या सुविधा प्रत्येक नागरिकाला घरपोच मिळाव्यात अशा स्वरूपाचे रस्ते करावेत, अशी मागणी येथील नागरिकांनी नगरपरिषदेकडे केली आहे. भंडारवाडा शिवाजी नगर असलेल्या ठिकाणी एखादा अपघात झाला तर रस्ता अरुंद असल्याने रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहोचणारी 108 रुग्णवाहिका घरापर्यंत रस्त्याअभावी पोहोचू शकत नाही. त्यामुळे रुग्णाला त्रास सहन करावा लागतो. तसेच नगरपरिषदेची सांडपाणी वाहून नेणारी गाडी रस्त्याअभावी गरजवंतांच्या घरापर्यंत पोहोचत नाही.

तसेच एखादाच्या घरी आग लागल्यास अग्निशमन गाडीदेखील घरापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. तरी नगरपरिषदेने भंडारवाडा कोळीवाडा येथील अंतर्गत बांधकाम करताना रुग्णवाहिका, अग्निशमन बंब प्रत्येकाच्या घराजवळ पोहचेल एवढे रस्त्याचे रूंदीकरण करून येथील नागरिकांची रस्त्याअभावी होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Exit mobile version