जागा उपलब्ध करून द्या, सुसज्ज स्टेडीयम बांधून देतो – आ. जयंत पाटील

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
कबड्डी हा तांबड्या मातीतील मर्दानी व रांगडा खेळ असून सध्या हा खेळ देशविदेशात लोकप्रीय ठरत आहे. या अस्सल मातीतील खेळाला सध्या ग्लॅमर प्राप्त झाले आहे. स्व. महादेव बापुराव खाडे स्मृती चषकाचे आयोजन जय हनुमान रासळ या मंडळाच्यावतीने करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन उपसरपंच नरेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन आ.जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलत असताना रायगड कबड्डी खेळाची पंढरी असून या मातीतून भविष्यात देशाच्या कबड्डी संघाचे नेतृत्व करणारे खेळाडू रायगडच्या मातीतून निर्माण होतील असा विश्‍वास आ.जयंत पाटील यांनी व्यक्त केला. रासळ या गावाशी जुने नाते असून स्व. शांताराम खाडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केले आहे. रासळसारख्या गावात आपण अशा भव्य दिव्य स्पर्धा भरविता याचा मला आनंद होत आहे. जर आपण जागा उपलब्ध करून दिलीत तर माझ्या फंडातून सुसज्ज असे स्टेडीयम बांधून देतो. आम्ही जो शब्द देतो तो पाळतो असेही आ. जयंत पाटील म्हणाले. शेतकरी कामगार पक्षाची नाळ ही सर्वसामान्य जनतेशी जुळलेली आहे. कुणी येतील, कुणी जातील मात्र विकास करण्याचे काम फक्त शेतकरी कामगार पक्षच करू शकतो. तसेच, राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्यासाठी सुधागडसह जिल्ह्यातील खेळाडूंना शेकापच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

उत्कृष्ट संसदपट्टू ठरलेले धैर्यशिल पाटील यांना पुन्हा आमदार करावयाचे असून गीता पालरेचा यांनी त्रास देऊ नये असा आ.पाटील यांनी राष्ट्रवादीला टोलाही लगावला.

आ. जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात सुरेश खैरे यांचेही कौतुक करून खैरे हे वडील नामदेव खैरे यांच्या सारखेच ताकतीने जनसेवा व विकासकामे करीत आहेत. कमी बोलणारे पण विकासकामे झपाट्याने करणारे असे खैरे हे संपूर्ण जिल्हाला परिचित आहेत. ते पुढे म्हणाले की, कबड्डीसारखा खेळ हा गावागावात खेळला गेला पाहीजे.

यावेळी सुरेश खैरे, नगराध्यक्षा गीता पालरेचा, उपनगराध्यक्ष आरिफभाई मणियार, अ‍ॅड. सुभाष पाटील, पराग मेहता, संजोग शेठ, जे.बी.गोळे, गोविंद तळेकर, जित मल्होत्रा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष नितीन लहाने, चेतन तेलंगे, परेश खाडे, अक्षय खाडे यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.

वायुसूत ओढांगी विजयी
जय हनुमान क्रीडा मंडळ रासळ यांनी जिल्हा आणि सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने कै. महादेव बापूराव खाडे स्मृती चषक 2022 जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन 3 मे रोजी रासळ येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतील अंतिम सामना वायुसूत ओढांगी विरुद्ध श्री गणेश कासु या दोन संघांमध्ये झाला. या अटीतटीच्या अंतिम लढतीत जितेश पाटील यांनी बहारदार खेळ करत वायुसूत ओढांगी या संघास विजय केले. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक वायुसूत ओढांगी या संघास रोख रक्कम 25 हजार व चषक, द्वितीय क्रमांक श्री गणेश कासु 15 हजार व चषक, तृतीय क्रमांक मिडलाईन कर्जत 10 हजार व चषक, चतुर्थ क्रमांक कालभैरव उदडवणे 10 हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील सर्वात्कृष्ट खेळाडू जितेश पाटील (ओढांगी) उत्कृष्ट चढाई करणारा प्रेषित बोरकर (कासु) तर उत्कृष्ट पक्कड दीपक कासारे (उदडवणे)पब्लिक हिरो सुयोग गाईकर (कर्जत) यांना आकर्षक बक्षिसे आणि चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण जय हनुमान क्रीडा मंडळ रासळचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मंडळाच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेतील खेळाडुंनी उत्कृष्ट व दर्जेदार खेळाचे सादरीकरण करावे व कबड्डी रसिकांच्या मनावर अखंड अधिराज्य गाजवावे. प्रत्येक खेळाडूने खिलाडूवृत्तीने जय पराजयाचा स्विकार करावा. ग्रामीण भागातील उदयोन्मुख व होतकरू खेळाडूंना अशाप्रकारच्या स्पर्धांतून प्रोत्साहन मिळत असते. या स्पर्धेत उत्कृष्ट व दर्जेदार खेळ सादर करून पुढे हेच खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवण्यास सज्ज होतात. हेच खेळाडू पुढे जिल्हा व राज्याचे देशपातळीवर नावलौकिक करतात.

माजी आ.धैर्यशील पाटील
Exit mobile version