राजस्थान रॉयलचा मलिंगा गोलंदाजी प्रशिक्षक

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामास अवघे काही दिवस उरले आहेत. आगामी हंगामासाठी जवळपास सर्वच संघ आर्थिक राजधानी मुंबईत पोहोचू लागले आहेत. आयपीएल 2022 सुरू होण्याआधी राजस्थान रॉयल्सच्या संघाने मोठा निर्णय घेतला आहे. खरेतर, फ्रँचायझीने 38 वर्षीय श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याला त्यांच्या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

लसिथ मलिंगान अलीकडेच ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर श्रीलंकेच्या संघाला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले होते. एवढेच नाही तर आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्ससोबत दीर्घकाळ आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. मलिंगाने 2009 ते 2019 दरम्यान आयपीएलमध्ये एकूण 122 सामने खेळले असून 122 डावांमध्ये 19.79 च्या सरासरीने 170 बळी घेतले आहेत. यादरम्यान त्याने एकदा पाच आणि सहा वेळा चार बळी घेण्याचा पराक्रमही केला आहे.

लसिथ मलिंगा सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा जगातील पहिला खेळाडू आहे. श्रीलंकेच्या या स्टार वेगवान गोलंदाजानंतर कॅरेबियन अष्टपैलू ड्वेन ब्राव्होचे नाव घेतले जाते. ब्राव्होने 2008 ते 2021 दरम्यान आयपीएलमध्ये अनेक संघांसाठी 151 सामने खेळून 148 डावांमध्ये 24.31 च्या सरासरीने 167 बळी घेतले आहेत. मलिंगाशिवाय श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराही सध्या राजस्थान रॉयल्सच्या संघाशी संबंधित आहे. संगकारा संघात क्रिकेट संचालक म्हणून कार्यरत आहे. अशा स्थितीत आगामी मोसमात या दोन श्रीलंकन जोडीमुळे संघ किती मोठी मजल मारतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Exit mobile version