मल्याण गावाने जपला परंपरेचा वारसा

विसर्जनापूर्वी गौराईला डोक्यावर घेऊन फेर; डिजिटल युगात रमणाऱ्या पिढीचा सहभाग

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील मल्याण गावाला समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा वारसा लाभला आहे. आधुनिकतेच्या काळातही गावाने आपल्या अनेक परंपरा आजही श्रद्धेने आणि उत्साहाने सुरू ठेवल्या आहेत. त्यापैकीच एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे गौरी विसर्जनापूर्वी गौरीमातेला डोक्यावर घेऊन पारंपरिक फेर घेण्याची आणि नाचण्याची अनेक वर्षाची परंपरा जपण्यात आली आहे. त्यानंतर उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात गौराईचे विसर्जन करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या काळात मल्याण गावात गौरीमातेचे आगमन मोठ्या भक्तिभावाने केले जाते. गावातील परंपरेनुसार गौरीमाता ही माहेर करीण मानली जाते. गणपतीच्या आगमनानंतर ती माहेरी आलेल्या मुलीप्रमाणे घरात येते आणि कुटुंबीय तिचे प्रेमाने व आदराने स्वागत करतात. दीड दिवसांच्या या वास्तव्यादरम्यान गौरीमातेची पूजा-अर्चा केली जाते. घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

गौरी विसर्जच्यावेळी मल्याण गावातील ही जुनी परंपरा विशेष आकर्षण ठरते. यावेळी गौरीमातेला डोक्यावर घेऊन गावकरी पारंपरिक फेर धरून नृत्य करतात. यावेळी संपूर्ण वातावरण भक्ती, उत्साह आणि पारंपरिक संस्कृतीच्या रंगात रंगून जाते. त्यानंतर पारंपरिक वाद्ये आणि गाण्यांच्या साथीने गावकरी गौरीईला मानाने विसर्जनासाठी घेऊन जातात. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि विविध मनोरंजनाची साधने उपलब्ध असतानाही मल्याण गावातील ग्रामस्थांनी ही परंपरा जपून ठेवली आहे.

यावर्षी देखील मल्याण गावाने ही परंपरा जपली आहे. संगणक आणि मोबाईलच्या युगात रमणारी पिढी देखील या उत्सवात मोठ्या सहभागी झाली होती. या पारंपरिक नृत्या बरोबरच पारंपरिक गाणी, रामायण आणि महाभारतातील विविध कथा, प्रसंग आणि पात्रांवर आधारित गाणी तसेच गौळणी घेण्यात आल्या. त्यामुळे ही केवळ धार्मिक विधी न राहता लोककला, मौखिक परंपरा आणि धार्मिक कथांचा अनोखा संगम ठरला. गावातील पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने एकत्र येऊन या परंपरेत सहभागी झाले होते. कोणताही भेद न ठेवता सर्वांनी या उत्सवात सहभागी होऊन आनंद साजरा केला. ज्येष्ठ नागरिकांकडून परंपरेचे महत्त्व आणि त्यामागील कथा आजच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

‌‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या!‌’

जिल्ह्यात शनिवारी (दि.19) गौरी-गणपतींना मोठ्या उत्साहात, बाप्पाच्या जयघोषात आणि भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी ग्रामीण भागांसह शहरात दुपारी 3.00 वाजल्यापासून ते रात्री उशीरापर्यंत विसर्जन मिरवणूकीचा जल्लोष सुरू होता. मिरवणूकीदरम्यान ढोल-ताशांचा गजर, पारंपारिक गाण्यांच्या सुराने तसेच “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.


विसर्जनाच्या ठिकाणी गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सर्व गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहाने आणि भावपूर्ण गौरी-गणपतींना निरोप दिला. यादरम्यान, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेषतः समुद्रकिनारा, तलाव, नद्या, ओढे आणि कृत्रीम तलाव याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

Exit mobile version