कुपोषण निर्मुलनासाठी टास्क फोर्स सक्रिय
माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांची भेट
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुका आदिवासी तालुका असल्याने या ठिकाणचे कुपोषणाची दरवर्षी राज्यभर चर्चा होत असायची. मात्र, मागील काही वर्षांत झालेले नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे कर्जत तालुक्याचे कुपोषण संपुष्टात आले आहे. याबाबत कुपोषण निर्मुलनासाठी आघाडीवर असलेल्या कर्जत तालुक्याची कुपोषण निर्मूलनाचे झालेल्या प्रयत्नांची माहिती राज्याचे टास्क फोर्सचे प्रमुख आणि माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी माहिती घेतली.
राज्यमंत्री दर्जा असलेले माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडून राज्यातील कुपोषणाचा आढावा घेतला जात आहे. त्या माध्यमातून तालुक्यातील कुपोषणाची माहिती घेण्यासाठी कर्जत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, राजिपच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रमुख निर्मला कुचिक, आदिवासी उप योजनेच्या प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, तसेच कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय म्हसकर, कशेळे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश कोकरे आणि तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात चांगला अनुभव असलेले राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांच्याकडे टास्क फोर्सची जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी कुपोषण, माता मृत्यू, बाल मृत्यू आणि नवजात मृत्यू यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या मृत्यूंची कारणे शोधून त्यावर प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच, कुपोषण कमी करण्यासाठी बालकांसाठी डे-केअर सुविधा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण सलला त्यांनी दिला. जोखमीच्या गरोदर मातांची नियमित तपासणी करण्यासाठी आशा आणि आरोग्य सेविकांनी वेळोवेळी भेटी द्याव्यात, अशी सूचना केली. घरी प्रसूती टाळाव्यात आणि स्थलांतरित गरोदर महिलांची माहिती संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात देण्यात यावी, असे निर्देश डॉ सावंत यांनी दिले. कर्जत तालुक्यातील खांडस, आंबिवली आणि कशेळे या भागांमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. कर्जत येथे पुढील महिन्यात पुन्हा आढावा बैठक घेतली जाईल, असे डॉ. सावंत यांनी जाहीर केले. या बैठकीनंतर डॉ. दीपक सावंत यांनी आयुष्मान भारत ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट तसेच उपजिल्हा रुग्णालय यांची पाहणी केली.
