| पेण | मुस्कान खान |
लहान मुलांकडून पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा, शैक्षणिक बदलामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीतही घेतल्या जाणार्या परीक्षा तसेच युवा पिढीला मोबाईल, कॉम्प्युटर व सोशल मीडियाचे लागलेले व्यसन यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाचे गाव हरवत चालले असून, जुने पारंपरिक खेळी हद्दपार होत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहेत.
आज मोबाईलच्या युगामध्ये उन्हाळयाची सुट्टी पडली की, मामाच्या गावाला जायची ओढच राहिलेली नाही. त्यातच वेगवेगळ्या शैक्षणिक बोर्डाचे वेगवेगळे नियम यामुळे बच्चे कंपनीला सुट्टी अनुभवताच येत नाही. एक काळ असा होता की, एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा संपतात कधी आणि शहराकडील मंडळी गावाकडे जातात कधी आणि गावाकडची असतील तर मामाकडे जायला आतुरच असायची. आज धावपळीच्या युगामध्ये मामाच शहरात येऊन राहिल्याने मामाकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. आणि कोकणी माणसाचा विचार केला तर धो-धो पाऊस पडतो. परंतू, उन्हाळ्याच्या सुट्टीच्या वेळेला ग्रामीण भागामध्ये पाणीटंचाईच्या मोठ्या झळा सोसाव्या लागतात, त्यामुळे मामादेखील गावाला जाण्याच्या फंदात पडत नाही.
मामाचं पत्र हरवलं अशा प्रकारचा खेळ बालपणी खेळला जायचा. पण आता मामाचे पत्र तर हरवलेच आहे. कारण आज तंत्रज्ञाच्या युगात पत्र काय असतं हे मुलांना माहीतच नाही. कारण मोबाईलच्या स्क्रीनमध्ये मुलं एवढी गुरफटलीत की, त्यामध्ये मामाचं पत्र पूर्णतः हरवूनच गेले आहे. शिवाय, उन्हाळ्याची सुट्टी पडली पण मामाच्या गावाला न जाता आता याच सुट्टीत जादा क्लासेस, व्हेकेशन क्लासेस, कॉम्प्युटर क्लासेस यांसह साहस शिबीर, समर कॅम्प यांसारखे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले असल्याने बरेच पालक आपल्या मुलांना उन्हाळी सुट्टीत मामाच्या गावाला पाठवण्याऐवजी अशा प्रकारच्या शैक्षणिक आणि बौध्दिक, साहसी शिबिरात पाठवणे पसंत करत आहेत.
बालपणी लहान मुलांना वार्षिक परीक्षा कधी संपते आणि कधी एकदा मामाच्या गावाला जातोय अशा प्रकारची ओढ लागायची. मामाच्या गावाला जाऊन विविध प्रकारचे खेळ खेळणे, मौजमस्ती करणे आणि त्यातच जर मामाचे गाव ग्रामीण भागात असेल, तर आंबे, करवंदे, जांभळं, रांजण, हटोरणं आदी प्रकारची उन्हाळ्यात येणारी फळे झाडावर चढून किंवा झाडावरुन पाडून खायची मज्जाच काही वेगळी होती. मात्र, आता दिवसेंदिवस होत चाललेले बदल, वाढते शहरीकरण, यामुळे कमी होत चाललेल्या शेती, वाड्या, फळबागा यामुळे मामाच्या गावाला जाऊन ती मजा करण्याचे दिवस हळूहळू कमी होत चालल्याने अनेक पालक आपल्या मुलांना उन्हाळी सुट्टीतील विविध उपक्रमांमध्ये गुंतून ठेवत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
मुले कार्टून बघण्यात व्यस्त लहान मुले मैदानी खेळ खेळण्यापेक्षा घरी टीव्हीवरील छोटा भीम, मोठु-पतलु आदी कार्टून बघण्यात व्यस्त असल्याचे दिसतात. मुलांना पारंपरिक खेळाकडे वळवणे गरजेचे आहे. मोबाईल, कॉम्प्युटर यामुळे मुलांची कार्यक्षमता कमी होत चालली आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त करणे ही काळाची गरज आहे.
मामाच्या गावाला जाऊन घराच्या समोरील अंगणात गोट्या, भवरे, सापशिडी, पत्ते, लंगडी, लपाछपी, आंधळी कोशिंबीर यांसारखे खेळ खेळले जात. ते आता फक्त आठवणींपुरते मर्यादित राहिले आहेत. पूर्वीसारखे घरासमोर असणारे मातीचे अंगण आता फारसे पहायला मिळत नाहीत.
स्वप्निल म्हात्रे, पालक







