| मुंबई | प्रतिनिधी |
महाविद्यालयीन तरुणीला अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करून सुमारे अडीच लाख रुपये खंडणी उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरूणीच्या प्रियकर आणि त्याच्या मित्राविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी 21 वर्षांची असून, मूळची हरियाणामधील आहे. सध्या शिक्षणासाठी ती मुंबईत राहते. तिचे महाविद्यालयात शिक्षण घेत असताना 20 वर्षीय तरुणाशी प्रेमसंबंध जुळले होते. त्यानंतर ते दोघे एकत्र राहत होते. या काळात तिच्या प्रियकराने पीडित तरुणीची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफिती काढून ठेवल्या होत्या. दरम्यान, काही कारणांमुळे दोघांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले. तरुणी त्याच्यापासून वेगळी झाली. यानंतर तिच्या प्रियकराने पीडित तरुणीची अश्लील छायाचित्रे 22 वर्षीय मित्राला दाखवली. या अश्लील छायाचित्रांच्या आधारे दोघांनी तिला ब्लॅकमेल करायचे ठरवले. त्यानुसार प्रियकर आणि त्याच्या मित्राने पीडित तरुणीला धमकवायला सुरुवात केली. त्यांनी तिच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे दिले नाही तर छायाचित्र सर्वत्र व्हायरल करण्याची धमकी त्यांनी दिली. घाबरून पीडित तरुणीने त्या दोघांना पैसे दिले. मात्र, त्यांची मागणी वाढतच होती. 15 जानेवारी 2025 ते 14 जुलै 2025 या 6 महिन्यांच्या काळात हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुरू होता. या सहा महिन्यांत तिने दोघांना 2 लाख 40 हजार रुपये दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुलगी सतत घरातून पैसे घेत असल्याने आईला संशय आला. सुरुवातील तरुणीने थातूरमातूर कारण देत सारवासारव केली. नंतर मात्र तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने तिच्या प्रियकराशी संपर्क साधला. आरोपींनी पीडित तरुणीच्या आईलाही धमकावले आणि आईवर बलात्कार करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात 15 जुलै रोजी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.







