खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर एकाचा बुडून मृत्यू

। पनवेल । प्रतिनिधी ।

खारघर येथील पांडवकडा धबधब्याजवळ बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 19) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. अग्निशामक दलाच्या वतीने प्रणव मिश्रा (16) राहणार कुर्ला या मृत तरुणाला बाहेर काढण्यात आले. मागील आठवड्यात गुरुवार 13 ऑगस्ट रोजी देखील पांडवकडा धबधब्याजवळ बुडून 23 वर्षीय आदित्य विश्वकर्मा या तरुणाचा मृत्यू झाला होता.

खारघर येथील पांडवकडा धबधबा येथे एक जण बुडाला असल्याची माहिती खारघर अग्निशामक केंद्राला बुधवारी सकाळी पावणे सहाच्या सुमारास समजली. यावेळी फायर जीप आणि जवान यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता धबधब्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी पडत होते. अग्निशामक दलाचे जवान यांनी पाण्यात उतरून तरुणाचा सर्वत्र शोध घेतला. यावेळी एका दगडाच्या कपारीला दहा ते बारा फूट खोलवर एक जण मृत अवस्थेत आढळून आला. त्याला पाण्याच्या बाहेर काढून स्ट्रेचरवर ठेवून डोंगराच्या खाली उतरवण्यात आले आणि रुग्णवाहिकेने रुग्णालयात पाठवण्यात आले. प्रणव मिश्रा राहणार कुर्ला असे मृत तरुणाचे नाव असून घटनास्थळी खारघर पोलीस हजर होते. यावेळी अग्निशामक केंद्र, खारघर यांच्याकडून प्रशांत दरेकर अग्निशमन प्रणेता, एन एम कडू फायरमन, यु एम पाटील, एस बी मोहिते आणि एसव्ही पाटील यंत्रचालक उपस्थित होते. दरम्यान या परिसरात नागरिकांनी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडन करण्यात येत आहे.

Exit mobile version