मानवनिर्मित कचरा प्राण्यांच्या जिवावर

शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान; उपाययोजना करण्याची गरज

। कोलाड । वार्ताहर ।

मानवाच्या हलगर्जीपणामुळे तसेच पर्यावरणाबाबत असलेल्या प्रचंड उदासिनतेमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन प्रचंड प्रमाणात बिघडत चालले आहेे. याचा परिणाम प्राणी मात्रांवर होत असून या कचर्‍यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

भारत देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळे बहुतेक लोकांचा व्यावसाय शेती हा आहे. तर, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुधन आणि दुग्ध उत्पादन असा व्यवसाय ते करीत आहेत. परंतु, वाढते शहरीकरण व वाढत्या लोकसंख्येचा बेजबाबदार प्रवृत्तीचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. शेतीला पूरक असणार्‍या पशुधनावर देखील याचा विपरीत परिणाम होत आहे. आपल्या निष्काळजीपणामुळे पर्यावरणातील ठिकठिकाणी साठवलेल्या घाणीच्या साम्राज्यावरील प्लॅस्टिक गुरेढोरांच्या जिवावर उठत आहे. वातावरणातील प्लॅस्टिक इतर खाद्याबरोबर पोटात गेल्याने गुरेढोरे किंवा इतर प्राणिमात्रांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, प्लॅस्टिक पिशव्या खाल्ल्याने पचानक्रियेसह रवंथ क्रियेवरदेखील परिणाम होऊ लागला आहे. यामुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे.

देशात प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असूनदेखील त्यांचा बेसुमार वापर केला जात आहे. बाजारात जातांना कापडी पिशवी नेण्यास कमीपणा वाटतो. तर, बाजारासाठी दुकानदारांकडून पुरविल्या जाणार्‍या प्लॅस्टिक पिसाव्यांना सर्वत्र ठिकाणी प्राधान्य दिले जात आहे. या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे काम झाल्यावर त्या पिशव्या कुठेही फेकून दिल्या जातात. यामुळे आपल्या सभोवती प्लॅस्टिक पिशव्यांच्या कचर्‍याचे साम्राज्य वाढत चालले आहे. कचर्‍यामुळे प्राणीमात्रांना होणार्‍या त्रासासोबतच आजूबाजूला रोगराईदेखील पसरत आहे. यामुळे खड्डे खोदून अशा कचर्‍याचा विल्हेवाट लावण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

Exit mobile version