आग विझवण्यात वन विभाग अपयशी; पशु-पक्ष्यांचा अधिवास धोक्यात
| खोपोली | प्रतिनिधी |
दरवर्षी रस्ते, वाढते शहरीकरण, औद्योगिक विकास आणि खाणींच्या नावाखाली हजारो वृक्षे तोडली जात आहेत. त्यातच वणव्यांची भर पडून आधीच कमी झालेली जंगले आणखी कमी होत असल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. या वणव्यात वन्यजीव व पशू-पक्ष्यांचा होरपळून मृत्यू होत आहे. खालापुर तालुक्यातील ग्रामीण भागात देखील बहुतांशी ठिकाणी मानव निर्मित वणवे लावले जात असल्याने ते निसर्ग सौंदर्याच्या मुळावर उठल्याचे निसर्गप्रेमींकडून बोलले जात आहे. तसेच, हे वणवे रोखण्यासाठी संबंधित प्रशासनाकडून उपाययोजना राबविण्यात येत असूनही ते अपयशी ठरत असल्याचे देखील स्थानिकांसह निसर्गप्रेमींकडून बोलले जात आहे. त्याचा परिणाम वातावरणात दिसून येत आहे.
यंदाच्या लांबलेल्या पावसाने जिल्ह्यातील डोंगर हिरवेगार झाले होते. आता हिवाळा सुरू झाला असून दुपारच्या वेळेला उन्हाची तीव्रता देखील हळूहळू वाढू लागली आहे. परिणामी डोंगरावरील हिरवेगार दिसणारे गवत सुकू लागले आहे. या सुकणाऱ्या गवताना अचानक वणवे लागण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. त्याचा परिणाम निसर्गावर होत आहे. त्यामुळे हिरवेगार दिसणारे डोंगर अचानकपणे काळे दिसू लागले आहेत. त्यामुळे येथील जंगलांवर अबलंबून असणारे पशु-पक्षी व वन्य जीवांचा रहिवास संपुष्टात आला आहे. असेच चित्र खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. त्यामुळे डोंगरासह परिसराची शोभा हरवत चालली आहे.
जंगलात वणवा लागण्याची दोन कारणे आहेत. एकतर झाडांच्या सुकलेल्या फांद्या एकमेकांना घासून त्यातून आगीची ठिणगी निर्माण होऊन वणवा लागतो. तर, दुसरे कारण म्हणजे मानवाने जाणिवपुर्वक लावलेला वणवा. मात्र, आताच्या काळात मानवनिर्मित वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. खालापूर तालुक्यातील शहरीकरण, शिकार इत्यादी कारणांसाठी जंगलासह शेतात व ओसाड माळरानावर वणवे लावण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. या मानवनिर्मित वणव्यामंध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान होत असून त्याचबरोबर दुर्मिळ वन्यजीवांच्या जाती देखील नष्ट होऊ लागल्या आहेत. अनेक उपाय करूनही वणवे थांबण्याचे नाव घेत नसल्याने हे वणवे खालापूर तालुक्यात वन विभागाची डोकेदुखी ठरू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत असतानाच डोंगरांना व परिसरात अचानक आग लागून वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. वणव्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी वनविभागाकडून दरवर्षी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात; तरीदेखील वणव्यांच्या घटनांचे प्रमाण हवे तसे कमी होताना दिसत नाही. त्यामुळे मानवनिर्मित वणवे हे निसर्ग सौंदर्याच्या मुळावर उठत असून यावर वेळीच उपायोजना न राबवल्यास आगामी काळात उन्हाची तीव्रता अधिक वाढून अनेकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागणार, अशी चिंता निसर्गप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
जैवविविधता धोक्यात
वृक्षराजांनी समृद्ध असलेल्या डोंगर रांगा वणव्यांमुळे उजाड होत आहेत. या वणव्यांत मोठ्या वृक्षांबरोबरीने लहान रोपांचीही हानी होत असल्याने बहुसंख्य शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत सापडले आहेत. वन्य प्राण्यांनाही या वणव्यांच्या मोठ्या प्रमाणात झळा बसत असून त्यांचे अधिवास देखील नष्ट होत आहेत. तर, वेळीच वणवे रोखले नाही तर असणारी जैवविविधता धोक्यात येणार यात तिळमात्र शंका नाही.
ही भूमाता जिच्या पोटी आपण जन्म घेतला, तिची मनुष्याव्यतिरिक्त अनेक संताने आहेत. की जे आपले बांधव आहेत. म्हणजे वृक्ष, वेली, पशु-पक्षी, सरपटणारे प्राणी, किडे, मुंग्या, असे असंख्य जीव या भुमातेच्या अंगा खांद्यावर खेळत, बागडत असतात. त्याचबरोबर हे असंख्य जीव आपले निसर्गचक्र नीट राखण्याचे काम माणसापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने करीत असतात. परंतु, अशा प्रकारे वणवे लावून माणुस निसर्गचक्रामध्ये हस्तक्षेप का करीत आहे? डोंगराला वणवे लावून आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारीत आहोत.
– गुरूनाथ साठिलकर, निसर्गपेमी







