‘बस स्थानकातील स्वच्छतागृह जनतेसाठी खुले करा’

मनसेचा आंदोलनाचा इशारा
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
पाली बस स्थानकातील सार्वजनिक स्वच्छतागृह प्रवासी व जनतेसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी सुधागड मनसेतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन नुकतेच पाली परिवहन कार्यालयाला देण्यात आले. पाली बस स्थानकातील सार्वजनिक स्वच्छतागृह जलद सुरु करा, अन्यथा मनसे स्टाइलने दणका देऊ, असा इशारा मनसेने निवेदनातून दिला आहे.

दीड वर्षांपूर्वी पाली बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी बसस्थानक इमारत तोडण्यात आली आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून स्थानक आवारात प्रवासी शेड, कार्यालय, कर्मचारी निवारा खोली व स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. मात्र, हे सार्वजनिक स्वच्छतागृह प्रवाशांसाठी सुरू केलेले नाही. परिणामी, प्रवाशांची विशेषतः स्त्रियांची मोठी गैरसोय होत आहे. तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी व राज्य भरतील भाविक येथे येतात. त्यामुळे स्वच्छतागृहाच्या अभावी त्यांची कुचंबणा होत आहे.

ही बाब मनसे पाली शहर अध्यक्ष दिपेश लहाने यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हे सार्वजनिक स्वच्छतागृह नागरिकांसाठी तसेच प्रवाशांसाठी चालू करण्यासाठी मनसेकडून परिवहन व्यवस्थापक पाली सुधागड यांच्याकडे मागणी केली. हे जर स्वच्छतागृह नागरिकांसाठी सुरू केले जात नसतील तर सुधागड मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मनसे स्टाईलने आंदोलन करेल, अशा इशारा देण्यात आला. व यास सर्वस्वी परिवहन महामंडळ जबाबदार असतील असे सांगण्यात आले.

यावेळी मनसे पाली शहर अध्यक्ष दिपेश लहाने, मनविसे सुधागड तालुका अध्यक्ष भावेश बेलोसे, जांभूळपाडा विभाग अध्यक्ष शेखर चव्हाण, मनसैनिक सनी यादव, सामाजिक कार्यकर्ते राकेश ठाकूर आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version