| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनतर्फे राज्यातील बेस्ट सीईओ हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार रायगड जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांना प्रदान करण्यात आला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथील कार्यक्रमात राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. यावेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महाराष्ट्र बँक असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. मंदार वर्तक यांनी हा पुरस्कार बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील आणि बँक्स असोसिएशनच्या संचालिका सुप्रिया पाटील यांच्या उपस्थितीत स्वीकारला.
मंदार वर्तक यांनी 2022 साली रायगड जिल्हा सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, अल्पावधीतच बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उल्लेखनीय वाटचाल केली. त्यांच्या कार्यकाळात सहकारी संस्थाचे देशातील पहिले संगणकीकरण, 6500 कोटी रुपयांचा व्यवसाय तसेच आयएमपीएस, क्यूआर कोड सेवा, मोबाईल बँकिंग आणि इतर डिजिटल सेवा ग्रामीण ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या. पारंपरिक बँकिंगकडून आधुनिक संगणक प्रणाली, प्रशासकीय पारदर्शकता आणि सेवा सुधारणांमुळे बँक राज्यातील आघाडीच्या जिल्हा बँकांमध्ये गणली जात आहे.
विशेष म्हणजे बँकेने नाबार्ड, राज्य सहकारी बँक, आणि सहकार विभागाने ठरवलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. मंदार वर्तक यांच्या नेतृत्वाखाली बँकेने 60 पेक्षा अधिक शाखा व 17 एटीएमच्या माध्यमातून तळागाळातील गावकऱ्यापर्यंत आर्थिक सेवा पोहोचवल्या आहेत. त्यांनी सहकार, तंत्रज्ञान आणि सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीवर आधारलेले बँकेचे धोरण प्रभावीपणे राबवले. त्यांच्या म्हणण्यानुसार, बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांची दूरदृष्टी, उपाध्यक्ष सुरेश खैरे यांची खंबीर साथ तसेच संचालक मंडळाचे सुसंगत सहकार्य व बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांचे मार्गदर्शन हे या यशामागे मोठे योगदान आहे. तसेच बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे ग्राहकांच्या आणि हितचिंतकांच्या पाठिंब्यामुळे बँकेची प्रगती होत आहे असेही त्यांनी मनोगत व्यक्त केले. शिवाय या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे बँक पुढील 2 वर्षात 10, 000 कोटींचा व्यवसाय टप्पा पूर्ण करेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पुरस्कारामुळे रायगड जिल्हा सहकारी बँकेचा सन्मानच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील सहकारी बँकांसाठी एक नवा आदर्श व प्रेरणास्त्रोत निर्माण झाला आहे. मंदार वर्तक यांचे नेतृत्व हे राज्यातील सहकार चळवळीला नवी दिशा देणारे ठरणार असल्याचा विश्वास संपूर्ण सहकार क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
सहकार चळवळीला महाराष्ट्रात महत्वपूर्ण ऐतिहासिक आणि गौरवशाली परंपरा आहे. आपली अर्थव्यवस्था ही सहकार चळवळीवर अवलंबून आहे.
पंकज भोयर,
सहकार राज्यमंत्री






