दुलीप ट्रॉफी सामने खेळणे सक्तीचे

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आयपीएल 2024 आधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष केल्यामुळे इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर कठोर कारवाई केली होती. या दोन्ही खेळाडूंना बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळण्यात आले होते. बोर्ड याप्रकरणी मवाळ होण्याच्या मुडमध्ये दिसत नाही. मात्र, आता यातून काही खेळाडूंना सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी यावेळी स्पष्ट केले आहे की, जर स्टार क्रिकेटपटू राष्ट्रीय संघातून खेळत नसतील तर त्यांना देशांतर्गत सामन्यांसाठीही उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, रोहित शर्मा, विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या खेळाडूंना सूट देण्यात आली आहे. त्यांना खेळायचे आहे की नाही हे ते स्वत: ठरवतील. रोहित, विराट आणि बुमराह व्यतिरिक्त बीसीसीआय इतर सर्व कसोटी खेळणार्‍या खेळाडूंनी ऑगस्टमध्ये बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांपूर्वी किमान एक किंवा दोन दुलीप ट्रॉफी सामने खेळावेत, अशी इच्छा आहे. दुलीप ट्रॉफीसाठी प्रादेशिक निवड समितीऐवजी राष्ट्रीय निवड समितीकडून निवड केली जाईल. बांगलादेश आणि न्यूझीलंडसोबतची कसोटी मालिका घरच्या भूमीवर होणार आहे. जागतीक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामनाच्या दृष्टिकोनातून दोन्ही मालिका महत्त्वाच्या असणार आहेत. याशिवाय वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौर्‍याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

Exit mobile version