बल्लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी

पन्नास हजारहून जास्त भाविक दाखल

। पाली/बेणसे । वृत्तसंस्था ।

रायगड जिल्ह्यातील पाली-खोपोली राज्य महामार्गालगत असलेल्या पाली येथील बल्लाळेश्‍वर मंदिरात अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त मंगळवारी (दि.25) दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी पहाटे पासूनच दर्शनासाठी भाविकांनी लांब रांगा लागल्या होत्या. तसेच, जवळपास पन्नास हजारहून अधिक भाविक दाखल झाले होते. यावेळी बल्लाळेश्‍वर मंदिर व श्रींचा गाभारा फुलांनी सजवण्यात आला होता. तसेच, बल्लाळेश्‍वरला देखील आभूषण व वस्त्र परिधान करण्यात आले होते. मंदिराबाहेर देखील रांगोळी काढण्यात आली होती.


वर्षातील ही एकमेव अंगारकी चतुर्थी असल्यामुळे बल्लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभरातून भाविक दाखल झाले होते. यामुळे येथे चांगली आर्थिक उलाढाल झाली असून येथील स्थानिक व्यावसायिक सुखावले आहेत. भाविकांमुळे येथील हॉटेल व्यावसायिक, लॉजिंग बोर्डिंगवाले, पापड, लोणचे, मिरगुंड विक्रेते, पेढेवाले, सरबतवाले, छोटेमोठे दुकानदार व इतर व्यावसायिकांचा धंदा तेजीत होता. विविध वस्तूंनी भरलेली दुकाने व गर्दीमुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते. यावेळी भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. दर्शनासाठी येताना अनेक भाविक आपली खासगी वाहने घेऊन आले होते. तर, काही खाजगी बसेसने आले होते. यामुळे पालीतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

आदिवासींना रोजगार
अनेक आदिवासी महिला आंबे, कोकम, जांभळे करवंद आदी रानमेवा घेऊन विक्रीसाठी बसल्या होत्या. भाविकांनी मोठ्या प्रमाणात हा रानमेवा खरेदी केला यामुळे आदिवासी महिलांना रोजगार मिळाला.

एकमेव अंगारकी चतुर्थी असल्यामुळे भाविकांच्या येणार्‍या गर्दीचा अंदाज घेऊन योग्य व्यवस्थापन व नियोजन करण्यात आले आहे. बल्लाळेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाणी व इतर व्यवस्था करण्यात आली आहे. नाममात्र दरात प्रसादालयामध्ये प्रसाद (भोजन) उपलब्ध आहे. सुरक्षारक्षक तैनात आहेत. भाविकांना राहण्यासाठी दोन सुसज्ज सर्व सोयी सुविधांनी युक्त आधुनिक भक्त निवास आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. तसेच, सुसज्ज स्वच्छता गृह देखिल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही. देवस्थान ट्रस्टतर्फे सर्वतोपरी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.

जितेंद्र गद्रे,
अध्यक्ष,
बल्लाळेश्‍वर देवस्थान ट्रस्ट,
पाली
Exit mobile version