माणगाव बस आगार महाराष्ट्रात अव्वल; गणेशोत्सवात विक्रमी उत्पन्न

आगार व्यवस्थापकांचा पंकज तांबेंकडून सत्कार

| माणगाव | प्रतिनिधी |

कोकणात गौरी-गणपती सणाला जाणार्‍या गणेशभक्तांना वेळेवर आपल्या इच्छित स्थळी जाता यावे यासाठी माणगाव बस आगाराने नेटके बस फेर्‍यांचे नियोजन करून प्रवाशांना सेवा पुरवली. माणगाव बस आगाराने एक दिवसाचे उत्पन्न 7 लाख 72 हजार 414 रुपये मिळवून महाराष्ट्रात विक्रम केला. या विक्रमी उत्पन्नामुळे माणगाव बस आगार महाराष्ट्रात पहिला आला. त्यामुळे प्रवासी स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंकज तांबे यांनी बस आगार व्यवस्थापक चेतन देवधरे व त्यांचे कर्मचारी यांचा सत्कार करून अभिनंदन केले. माणगाव बस आगाराने महाराष्ट्रात मानाचा तुरा रोवला आहे.

गौरी-गणपती परतीची जादा वाहतूक 2022 च्या अनुषंगाने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रायगड विभागाने सर्व आगारांना दरवर्षीप्रमाणे उत्पन्नाचा 5 लाख 56 हजार रुपयाचा इष्टांक घालून दिला होता. माणगाव बस आगाराने 7 सप्टेंबर या एका दिवसाचे 7,72,414 रुपये एवढे उत्पन्न मिळवून भारमानात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला. या उज्ज्वल यशात माणगाव बस आगराचे व्यवस्थापक, सर्व परीवेक्षक, चालक, वाहक, यांत्रिकी, प्रशासकीय कर्मचार्‍यांचे मोलाचे योगदान मिळाले.

याबाबत पेण-रायगड विभाग नियंत्रकांनी अभिनंदन केले आहे. शिवाय, या यशाचे कौतुक माणगावसह रायगड जिल्ह्यातील विविध स्तरातून होत आहे. याबाबत स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष तांबे यांनी माणगाव बस आगारात सत्कार समारंभाचे आयोजन करीत आगार व्यवस्थापक चेतन देवधरे यांचा सत्कार केला. यावेळी परिवहन महामंडळाचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक तुषार हाटे, वरिष्ठ लिपिक कृष्णा चौरे, रविद्र वाढवळ, राजेश गांधी, दीपक गोरेगावकर, स्वराज्य संघटनेचे कायकर्ते स्वप्नील शिर्के, संभाजी गायकवाड, नरेश कदम यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

माणगाव येथे 14 एप्रिल 2011 मध्ये आगार अस्तित्वात आले. त्याला 11 वर्षे लोटले गेली. दोन वर्षे कोरोनामध्ये माणगाव बस आगाराच्या उत्पन्नात घट झाली होती. त्या उत्पन्नाची तूट भरून काढीत गणेशोत्सवात नेटके नियोजन करून आगाराने विक्रम केला. माणगाव आगाराने केलेल्या या कामगिरीचे कौतुक सर्वत्र होत आहे.

गणेशोत्सवात विक्रमी कमाई
गणेशोत्सव काळात माणगाव बस आगारातून 97 जादा बस गाड्या सोडल्या होत्या. यामध्ये मुंबई, ठाणे, बोरिवली, नालासोपारा, पनवेल, या भागातील प्रवाशावर लक्ष केंद्रित करून नेटके नियोजन केले होते. गणेशोत्सवापूर्वी दि. 28 ते 30 ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत 11 लाख 62 हजार 577 रुपये, तर दि. 6 ते 8 सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत 18 लाख 84 हजार 310 रुपये असे एकूण 30 लाख 46 हजार 887 रुपये उत्पन्न मिळवले.

Exit mobile version