माणगाव, इंदापूर बायपासचा तिढा कायम

शहरात वाहतूक कोंडी रस्ता वनखात्याच्या जमिनीतून

| माणगाव । वार्ताहर ।
कोकणासह तळ कोकणच्या विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा मुंबई गोवा महामार्गाची दिवसेंदिवस अवस्था पाहवेना झाली असून या मार्गाच्या कामाची गेली बारा वर्षा पासून चांगलीच रखडपट्टी सुरु आहे. माणगाव व इंदापूर शहरात वाहतूक कोंडी सतत होत असल्याने प्रवासी नागरिकांची चांगलीच रखडपट्टी होत आहे. तळ कोकणासह गोव्याकडे जाणार्‍या नागरिकांना माणगाव बाजारपेठेत अडथळा होऊ नये म्हणून माणगावच्या बाहेरून शहराला बायपास रस्ता काढला असून या बायपास मार्गाचे काम सात वर्षापासून थांबले आहे. हा बायपास रस्ता वनखात्याच्या जमिनीतून व कोकण रेल्वेला उड्डाण पूल होत असल्याने इंदापूर आणि माणगाव येथील दोन्ही शहरा लगतचे बायपासचे काम रखडले जात आहे. त्यातच वैयक्तिक मालकी जमीनीच्या कांही मालकाना भूसंपादनाचा मोबदला मिळाला नसल्यामुळे बायपासचे काम रखडले आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी 3 एप्रिल 2022 रोजी इंदापूर येथील कार्यक्रमात मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्त्याचे काम एक वर्षात पूर्ण करू अशी ग्वाही दिली होती.

माणगावात वाहतुकीचा ताण पडत असून वारंवार वाहतूक कोंडीशी सामना पर्यटक नागरिकांना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे कामाचे गेली अनेक दिवस घोंगडे भिजत पडले आहे. त्यामुळे प्रवाशी, पर्यटक, नागरिकांत कमालीची नारीजी पसरली आहे. अखेर शासनावर दबाव वाढत असल्याने या रुंदीकरणाच्या कामाची गाडी धीम्या गतीने का होईना सुरु असून त्या कामाला आणखीन म्हणावा तितकी गती मिळत नाही. कोकणच्या विकासाला अडथळा निर्माण करणार्‍या महामार्गाचे रुंदीकरण हे महत्वाचे असून कोकणाचे मुख्य प्रवेशद्वार समजले जाणार्‍या इंदापूर-माणगाव या महत्वाच्या शहराजवळून जाणार्‍या बायपास रस्त्याचे तीन-तेरा वाजल्याने कोकणवासीयातून प्रचंड नाराजी प्रसरली आहे.

Exit mobile version