माणगांव महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात

2,748 लाभार्थ्यांना योजनांचा लाभ; पोलीस पदीनिवड झालेल्या युवकाचा सन्मान

| माणगाव | प्रतिनिधी |

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार, जनतेच्या दारी कल्याणकारी योजनांचा लाभ थेट पोहोचवण्यासाठी बुधवारी (दि.22) माणगांव येथील ज. गांधी मेमोरिअल सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान उत्साहात पार पडले.

शासकीय कार्यक्रमास मंत्री आदिती तटकरे या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच प्रशांत शिंदे, संपर्क प्रमुख, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे वरिष्ठ शासकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरामध्ये एकूण 2,748 नागरिकांना निरनिराळ्या योजनांचा लाभ मंजूर करण्यात आला, ज्यातील 106 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मंचावर मान्यवरांच्या हस्ते लाभ सुपूर्द करण्यात आले. तसेच यामध्ये प्रामुख्याने शासनाच्या सुचनेनुसार, समाजातील वंचित व दुर्लक्षित घटक असलेल्या अनाथ घटकाला प्राधान्याने लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या अनुषंगाने तालुक्यांतील ढालघर येथील रहिवासी ओंकार शिंदे या युवकास माणगांव प्रशासनाने तत्परतेने अनाथ प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले. या प्रमाणपत्राच्या आधारे अनाथ समांतर आरक्षणांतर्गत ओंकार शिंदे यांची मुंबई पोलीस विभागात पोलीस शिपाई पदी निवड झाली आहे. या यशाबद्दल मंत्री तटकरे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

महसूल विभागामार्फत सर्वाधिक नागरिकांना विविध दाखले व योजनांचा लाभ देण्यात आला. त्यामध्ये 1,588 नागरिकांना जात प्रमाणपत्र, डोमिसाईल, उत्पन्न दाखले, ई. प्रमाणपत्र, 397 शेतकऱ्यांना जिवंत 7/12 मोहिमेतंर्गत सुधारित 7/12, 67 शेतकऱ्यांना अग्रीस्टॅक कार्ड, 61 लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेचे मंजुरी आदेश, 53 कुटुंबांना नवीन रेशनकार्ड, 27 नागरिकांना जन्म-मृत्यू नोंदणीचे अधिकृत आदेश, 3 महिलांना जमिनीवर हक्क मिळवून देत लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाभ, देण्यात आले.

आरोग्य सेवेचा विस्तार करण्यासाठी 221 नागरिकांना आभाकार्ड आणि आयुष्मान भारतकार्डचे वाटप करण्यात आले. नगरपंचायत विभाग माणगांव शहरी भागातील बेघर व गरजू नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 62 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी दिली. तसेच, शबरी आदिवासी घरकुल योजने अंतर्गत 35 आदिवासी कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला. प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी. महामंडळाकडून 48 नागरिकांना N.C.M.C. स्मार्टकार्डचे वाटप करण्यात आले.

कृषी विभागामार्फत 46 शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना व इतर कृषी योजनांचे लाभ देण्यात आले. जमिनीच्या मोजणीशी संबंधित 47 नागरिकांना मोजणीची सनद सुपूर्द करण्यात आली. महिला व बाल कल्याणासाठी विविध उपक्रम राबवून लेक लाडकी व प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत 25 माता व बालकांना योजनेचा लाभ देण्यात आला. 5 लाभार्थ्यांना पूर्व शालेय कोट्स वाटप, 3 नवजात बालकांच्या मातांना बेबी केअर किट सुपूर्द करण्यात आले.

बचत गटांना आर्थिक अनुदान
स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी 11 महिला बचत गटांना वैयक्तिक व्यवसायासाठी आर्थिक अनुदान देण्यात आले. तसेच, शिक्षण विभागामार्फत 11 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले व 37 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा वाटप करणेत आले आहे.
Exit mobile version