माणगाव नगरपंचायत निवडणुक होणार अटीतटीची

। माणगाव । प्रतिनिधी ।
येत्या 21 डिसेंबरला माणगाव नगरपंचायतीच्या होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस, भाजप पक्षाने माणगाव विकास आघाडीचा फॉर्म्युला तयार केला असून त्यावर अद्याप शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. शिवसेना व काँग्रेस यांच्यातील आघाडी निश्‍चित समजली जात असून भाजपचे तालुकाध्यक्ष संजय ढवळे यांच्याशी या विकास आघाडीबाबत आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी शिवसेना व काँग्रेसने आमच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला असून आमच्या पक्षश्रेष्टींबरोबर बोलून त्यानंतर आम्ही निर्णय घेणार असल्याचे सांगितले. या निवडणुकीकरिता राष्ट्रवादी बरोबर शेतकरी कामगार पक्ष येणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत शेकापचे माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी याबाबत आमच्याकडे कोणताही राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रस्ताव आलेला नसून कोणतीच चर्चा यासंदर्भात झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याअगोदर आम्ही माणगाव नगरपंचायत निवडणुकीत उतरणार असल्याचे सांगितले होते. परंतु निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अद्याप त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही.


यावेळेस माणगाव नगरपंचायतीत अनेक नवीन चेहरे दिसणार आहेत. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर शेकाप येण्याची चर्चा आहे.तर त्यांच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस, भाजप यांनी माणगाव विकास आघाडीचा फॉर्म्युला तयार केला असून यावर अद्याप शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. या विकास आघाडीबाबत शिवसेना, काँग्रेस, भाजप यांची दि.1 डिसेंबर रोजी माणगावात बैठक होऊन फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. अद्याप कोणीही अधिकृतपणे आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. एकंदरीत माणगाव नगरपंचायतीची हि सार्वत्रिक निवडणूक अटीतटीची होणार हे तितकेच खरे असून जनतेचं कौल कोणाला असेल हे 22 डिसेंबरला होणार्‍या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

Exit mobile version