माणगाव शेकाप तालुका चिटणीसपदी अस्लम राऊत

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या रिक्त झालेल्या तालुका चिटणीस पदावर तालुक्यातील मोर्बा येथील पक्षाचे जेष्ठ नेते तथा राजिपचे माजी कृषी सभापती अस्लम इब्राहिम राऊत यांची प्रभारी तालुका चिटणीसपदी नियुक्ती शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केली. अस्लम राऊत यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

अस्लम राऊत हे शेतकरी कामगार पक्षाचे जुने जाणते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून रायगड जिल्ह्यात सर्वत्र ओळखले जातात. स्वर्गीय प्रभाकर पाटील यांच्या बरोबरही अस्लम राऊत यांना रायगड जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी मिळाली आहे. माणगाव तालुक्यात शेकापची विचारधारा सर्वदूर पोहचविण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. रायगड जिल्हा परिषदेचे कृषी सभापती म्हणून त्यांनी चांगले काम केले असून आरडीसीसी बँकेचे ते संचालक आहेत.

माणगाव तालुक्यात आजही त्यांच्यामुळे शेकापची ओळख आहे. पक्षाच्या माध्यमातून विविध विकासाची कामे त्यांनी मोर्बा जिल्हापरिषद गटात केली आहेत. उत्तम संघटन व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी आहे. त्यांच्या शांत व संयमी स्वभावामुळे त्यांनी तालुक्यात अनेक माणसे जोडली आहेत. बहुजन समाजात ते शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. येणार्‍या सर्व निवडणुकांचा विचार करता तालुक्यात शेकाप अधिकतम मजबूत करण्यासाठी पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी अस्लम राऊत यांच्यावर तालुका चिटणीस पदाची जबाबदारी टाकली आहे.

यावेळी अस्लम राऊत म्हणाले कि, आजपर्यंत ज्या पद्धतीने पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले, तसेच काम यापुढेही सुरु ठेऊन पक्षश्रेष्टींच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शन खाली पक्ष संघटन मजबूत करून पक्षाच्या माध्यमातून गावागावात, वाडी-वस्त्यांमध्ये विकासाची कामे करून जनतेची सेवा करेन. समाजकार्य करताना माझ्या सहकारी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन येणार्‍या निवडणूका नजरेसमोर ठेऊन गावागावात शेकापची ध्येय-धोरणे पाहचविण्याचे काम प्रामाणिकपणे करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Exit mobile version