माणगाव तालुक्याला पाणी टंचाईच्या झळा !

जलजीवन मिशनची कामे अपूर्ण, 24 गावे 32 वाड्या पाणीटंचाईग्रस्त

| माणगाव | वार्ताहर |

शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यात अनेक गावांना पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. मात्र या योजनेतील किती कामे पूर्ण झाली हा संशोधनाचा विषय ठरला असून दरवर्षी प्रमाणे यंदाचे वर्षीही मार्च महिन्यापासून माणगाव तालुक्यातील गावांना पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. शासनाच्या पाणी टंचाई आराखड्यातून हि गावे वर्षानुवर्ष येत असून हि गावे पाणी टंचाई आराखड्यातून मुक्त कधी होणार हा प्रश्न नागरीकातून बोलताना उपस्थित होत आहे. माणगाव तालुक्यातील यंदाच्या वर्षी 24 गावे व 32 वाड्यातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे माणगाव तालुक्यातील पाणी टंचाईची साडेसाती नागरिकांच्या नशिबी कायमच राहिली आहे.

यंदा मार्च महिन्यापासूनच कांही गावातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरु झाली आहे. दिवसेंदिवस उष्णता वाढू लागल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावू लागल्याने माणगाव तालुक्यातील कांही गावातील पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. शासन या गावातील पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी ठोस उपाययोजना करीत नाही. मार्च महिन्यापासून माणगाव तालुक्यातील 24 गावे व 32 वाड्यातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असले तरी तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईशी सामना यापुढील काळात करावा लागणार आहे. हे वास्तव आहे. माणगाव तालुक्यातील राजिवली, टीटवे, वडाचा कोंड, जांभूळमाळ, बोरमाच, केळगण, जोर, हरवंडी, उमरोली, बामनगाव, चाच, मांजुर्णे, माकटी, रुद्रवली, पोटणेर, नगरोली, तळेगाव तर्फे गोरेगाव, उसर बुद्रुक, उसरर्कोंड, पळसप, मूळगाव, हेदमलई, पळसगाव खुर्द, हरवंडी, साई कोंड ही 24 गावे तर हुंबरी धनगरवाडी, कुंभेवाडी, आंब्रेवाडी, उमरोली बौध्दवाडी, येरद आदिवासीवाडी, नीळज आदिवासीवाडी, मोरेवाडी, मशीद्वाडी बौध्द्दवाडी, कातळवाडी, उधळेकोंड, सोनारवाडी, मळ्याचीवाडी, मशीद्वाडी, शिरसाड बौध्द्दवाडी, शिलीम बौध्द्दवाडी, चांदे आदिवासीवाडी, कुंभार्ते आदिवासीवाडी, गौळवाडी, कुंभारवाडी, मोकाशीवाडी, तोंडलेकर वाडी, कातेवाडी, पळसगाव खुर्द आदिवासीवा, खारबाचीवाडी, पळसगाव खुर्द धनगरवाडी, उसरबुद्रुक बौध्दवाडी, पानसई आदिवासीवाडी, खर्डी आदिवासी वाडी या 32 वाड्यांचा समावेश आहे. माणगाव तालुक्यात 147 गावात जलजीवन मिशनची कामे चालू आहेत. त्यापैकी 54 कामे पूर्ण झाली आहेत. 93 कामे पंगतीपथावर आहेत. त्यापैकी कांही कामे 50 ते 75 टक्के झाली आहेत.

शासनाच्या पाणी टंचाई आराखड्यात या गावांचा समावेश वर्षानुवर्षे पासून करण्यात येत आहे. मात्र कायमस्वरूपी पाणीपूरवठा योजना या गावांना अद्याप देण्यात आल्या का नाहीत. हा प्रश्न नागरिकांपुढे उभा आहे. या गावांना दरवर्षी साधारण एप्रिल महिन्यात टॅकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. तसेच कांही वाड्यात रस्ता नसल्याने बैलगाडीने पाणीपुरवठा केला जातो. त्याचबरोबर या पाणी टंचाईग्रस्त गावे व वाड्या संभाव्य पाणी टंचाईग्रस्त असल्यामुळे माणगाव पंचायत समिती कार्यालयाकडून हा शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाणीटंचाई निवारणासाठी टॅकरने पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखली जात आहे. माणगाव तालुक्यातील 24 गावे व 32 वाड्या जरी शासनाच्या पाणीटंचाई आराखड्यात यंदाच्यावर्षी नोंदविल्या असल्या तरी या व्यतिरिक्त अनेक गावांना मे महिन्याअखेरीस पाणी टंचाईशी सामना करावा लागणार आहे.

Exit mobile version